…म्हणून संशोधक लसीलाही बनवत आहेत पर्याय | पुढारी

...म्हणून संशोधक लसीलाही बनवत आहेत पर्याय

न्यूयॉर्क :

कोरोना महामारीच्या सध्याच्या काळात जगात तीसपेक्षाही अधिक लसींची माणसावर चाचणी सुरू आहे. ‘द न्यूयॉर्क टाईम्स’ने दिलेल्या एका वृत्तानुसार सध्या 88 लसींची प्री-क्‍लिनिकल चाचणी सुरू आहे. त्यापैकी 67 लसी 2021 च्या अखेरपर्यंत क्‍लिनिकल चाचणीच्या स्तरावर येतील अशी अपेक्षा आहे. दुसरीकडे संशोधकांना लसींच्या प्रभावाबाबतही चिंता आहे. पहिली लस नंतरही प्रभावी ठरेल की नाही हे आताच सांगता येणे कठीण आहे. त्यामुळे संशोधक लसींना पर्याय म्हणून प्रोटिन, नाकात स्प्रे करण्याचे औषध व मृत विषाणूच्या उपचार पद्धतीचाही विकास करीत आहेत.

ब्राझीलच्या साओ पावलोमधील लस संशोधक लुसियाना लेईट यांनी सांगितले की, सुरक्षेसाठी कशा प्रकारची रोगप्रतिकारकता महत्त्वाची ठरेल हे आम्हाला अजूनही माहिती नाही. त्यामुळे लसींचा प्रभाव किती काळ टिकेल हे सांगता येत नाही. जॉर्जिया युनिव्हर्सिटीत इम्युनोलॉजीचे तज्ज्ञ टेड रॉस यांनी सांगितले की लसीचा प्रभाव पुढे कितपत टिकेल याबाबत शंका असल्यानेच वेगवेगळ्या रणनीतीवर काम करणे गरजेचे आहे. अमेरिकेत एका अशा लसीवर काम होत आहे जी शरीराला संक्रमण रोखण्यासाठी तयार करील. त्यामध्ये स्पाईक प्रोटिनचा विकास केला जाईल जो कोरोना विषाणूला आच्छादित करून रोखेल. ही लस अँटिबॉडीही विकसित करील. ‘एपिविक्स’ कोरोना विषाणूच्या अनेक भागांपासून बनवलेल्या लसींच्या चाचण्या घेत आहे. कोरोनाला कसे रोखता येईल हे त्यामधून दिसेल. ‘आयकोसेवॅक्स’ या स्टार्टअपने नॅनोपार्टिकल लसीच्या क्‍लिनिकल चाचण्यांची तयारी केली आहे. न्यूयॉर्कच्या कोडाजेनिक्स कंपनीने नाकात स्प्रे करून देण्याची लस बनवली आहे. तिची पहिली चाचणी सप्टेंबरमध्ये होईल.

संबंधित बातम्या

Back to top button