मांजर आहे की पिकाचू? | पुढारी | पुढारी

मांजर आहे की पिकाचू? | पुढारी

बँकॉक : मुलांबरोबर टीव्हीवरील कार्टून (सक्तीने) पाहणार्‍या लोकांना ‘पिकाचू’ नावाचा पोकेमॉन माहिती असेलच. पिवळ्या रंगाचा हा गोंडस, छोटा पोकेमॉन बच्चे कंपनीचा आवडता असतो. आता अशाच पिवळ्या रंगाचे एक मांजर सोशल मीडियात लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. हे मांजर नैसर्गिकरीत्याच पिवळे झाले नसून, ते अर्ध्या हळकुंडाने पिवळे झाले आहे!

थायलंडमधील एका महिलेने या मांजराचे अकाऊंट बनवले आहे. त्याचा रंग कसा बदलला याची कहाणीही तिने सांगितली आहे. या पाळीव मांजराच्या पायाला कसलेसे संक्रमण झाले होते. हळदीत अँटिबॅक्टेरियल गुण असतात व त्यामुळेच मांजराचा पाय निर्जंतुक करण्यासाठी त्याच्या पायाला हळदीचा लेप लावण्यात आला. हे करीत असताना पायाबरोबरच अख्खे मांजर पिवळे झाले व निळ्या कोल्ह्याच्या गोष्टीसारखीच त्याची अवस्था झाली! यामधील सुदैवाची बाब म्हणजे हळदीने आपला गुण दाखवलाच व मांजराच्या पायाचे संक्रमण ठीक झाले. आता हे पिवळे मांजर चांगलेच लोकप्रियही झाले आहे हा त्याचा एक ‘साईड इफेक्ट’!

Back to top button