कोरोना रुग्णांसाठी स्टेरॉईड ठरते प्रभावी | पुढारी

कोरोना रुग्णांसाठी स्टेरॉईड ठरते प्रभावी

वॉशिंग्टन :

जगात सध्या हाहाकार माजवत असलेल्या कोरोना विषाणूची बाधा झालेल्या गंभीर रुग्णांसाठी अनेक प्रकारचे ‘स्टेरॉईडस्’ उपयुक्‍त ठरू शकतात, असा दावा एका नव्या संशोधनात करण्यात आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या संशोधनात वरील दाव्याची पुष्टी करण्यात आली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या एकूण सात संशोधनांची माहिती नुकतीच अमेरिकन मेडिकल असोसिएशनच्या पत्रिकेत देण्यात आली. या संशोधनातील माहितीनुसार गंभीर रुग्णांमध्ये ‘प्लेसबो’ औषधांच्या तुलनेत ‘स्टेरॉईड’ औषधांच्या मदतीने मृत्यूचा धोका एक तृतीयांशने कमी केला जाऊ शकतो.

‘ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी’चे संशोधक डॉ. मार्टिन लँडरो यांनी सांगितले की, नव्या निष्कर्षामुळे स्टेरॉईडच्या मदतीने कोरोनावरील उपचाराची नवे पर्याय खुले झाले आहेत. तर इम्पिरियल कॉलेज लंडनचे संशोधक डॉ. अँटोनी गार्डन यांनी सांगितले की, कोरोनावरील उपचाराच्या दिशेने हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. मात्र, याबाबतीत अधिक जागरुक असणे गरजेचे ठरणार आहे. हे संशोधन सुमारे 1700 रुग्णांवर करण्यात आले आहे. या रुग्णांना स्टेरॉईडचे औषध देण्यात आले असता त्यांच्यात मृत्यूचा धोका कमी झाल्याचे आढळून आले.

Back to top button