प्रियांका सासरच्या कुटुंबात प्रिय! | पुढारी | पुढारी

प्रियांका सासरच्या कुटुंबात प्रिय! | पुढारी

‘देसी गर्ल’ प्र्रियांका चोप्रा परदेशातील सासरच्या घरात आता चांगलीच रूळली आहे. ती वेळोवेळी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पती निक जोनास तसेच जोनास कुटुंबातील अन्य सदस्यांसोबतचे फोटो व व्हिडीओ शेअर करीत असते. अलीकडेच तिने आपली मोठी जाऊ डेनिएल जोनास हिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. तिची अन्य एक जाऊ व अभिनेत्री सोफी टर्नर हिच्याबरोबरची तिची चांगलीच गट्टी आहे.

आपल्या सर्व जावांसमवेत तिचे अनेक फोटो प्रसिद्ध होत असतात. इतकेच नव्हे तर तिच्या सासूबाईंबरोबरही तिचे अतिशय प्रेमाचे संबंध आहेत. तिने आपल्या घरीच सासूबाईंचा वाढदिवसही साजरा केला होता.

निक जोनासबरोबर प्रियांकाचा डिसेंबर 2018 मध्ये जोधपूरमध्ये शाही थाटात हिंदू व ख्रिश्‍चन पद्धतीने विवाह झाला होता. त्यावेळीही सर्व जोनास कुटुंब उपस्थित होते. प्रियांका तिच्या सासू-सासर्‍यांची अतिशय लाडकी आहे. तिच्या सासूबाई डेनिस जोनास यांना भारताबद्दलही अतिशय प्रेम वाटते. गेल्या जन्मी मी भारतीयच होते असे मला नेहमी वाटते, असे त्या म्हणत असतात.

निक आणि त्याच्या भावांनाही भारत व भारतीयांबाबत आत्मियता आहे. याबद्दल ते नेहमी सोशल मीडियातूनही आपल्या भावना व्यक्‍त करीत असतात. दुसरीकडे प्रियांकानेही जोनास कुटुंबामधील कलेचा वारसा, प्रेमळ नातेसंबंध यांचा नेहमीच आदर केला आहे. कुटुंबातील चिमुरड्या सदस्यांनाही तिचा लळा आहे हे विशेष. एकंदरीत ती सासरीही चांगलीच प्रिय बनली आहे!

Back to top button