३०० हून अधिक तार्‍यांचे ‘हबल’ करणार संशोधन | पुढारी

३०० हून अधिक तार्‍यांचे ‘हबल’ करणार संशोधन

वॉशिंग्टन : अमेरिकन स्पेस टेलिस्कोप सायन्स इन्स्टिट्यूटने ‘नासा’च्या हबल स्पेस टेलिस्कोपच्या मदतीने एका नव्या मोहिमेस सुरुवात केली आहे. या मोहिमेंतर्गत पृथ्वीपासून जवळ असलेल्या 300 हून अधिक तार्‍यांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. ‘नासा’ने दिलेल्या माहितीनुसार या मोहिमेला युल्लिसस असे नाव देण्यात आले आहे. ‘हबल’चा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा संशोधन कार्यक्रम असल्याचे म्हटले जात आहे. 

या मोहिमेचे प्रमुख लक्ष्य म्हणजे एक आराखडा तयार करणे आहे. या मोहिमेचे नेतृत्व करणार्‍या अमेरिकन स्पेस टेलिस्को सायन्स इन्स्टिट्यूटच्या एका अधिकार्‍याने सांगितले की, या मोहिमेच्या माध्यमातून खगोल विषयासंबंधीची एक डेटासेटची निर्मिती करण्यात येईल. याच्या मदतीने शास्त्रज्ञांना अवकाशाबाबत माहिती मिळविणे सोपे जाईल.

हबल स्पेस टेलिस्कोप हे एक अवकाशात कृत्रिम उपग्रह म्हणून कार्यरत आहे. ही अत्याधुनिक वेधशाळाच आहे. ही वेधशाळा विकिरणांच्या मदतीने अवकाशात होत असलेल्या हालचालीसंदर्भात माहिती देते. ‘नासा’ने युरोपीय स्पेस एजन्सीच्या सहायाने अवकाशात ‘हबल’ला स्थापित केले आहे. यासंदर्भात ‘नासा’ने सांगितले की, या मोहिमेचा प्रमुख उद्देश म्हणजे ‘हबल’च्या मदतीने खगोलशास्त्रज्ञ तार्‍यांच्या जन्माबाबतची आकडेवारी उपलब्ध करून द्यावयाची आहे. याच ‘हबल’ने काही दिवसांपूर्वी पृथ्वीपासून सुमारे 7500 प्रकाशवर्षे अंतरावर तार्‍याच्या निर्मितीचा दुर्लक्ष क्षण टिपला होता.

Back to top button