तुमच्या झोपेवरही लक्ष ठेवले जातेय | पुढारी

तुमच्या झोपेवरही लक्ष ठेवले जातेय

न्यूयॉर्क : तंत्रज्ञान दिवसेंदिवस एवढ्या वेगाने विकसित होत चालले आहे की, एका मिनिटापूर्वीचा शोधसुद्धा जुना होऊ लागलाय. आता गुगल सर्च इंजिनने असे अभिनव तंत्रज्ञान विकसित करण्याचा ध्यास घेतला आहे की, त्याद्वारे माणसाच्या झोपेवरही लक्ष ठेवले जाईल. एवढेच नव्हे तर तुम्ही किती काळ घोरत होता आणि तुम्हाला किती शिंका आल्या याचाही हिशेब ठेवला जाणार आहे. एरव्ही फोन, जी-मेल, गुगल मॅप, यू ट्यूबचा वापर आपण दिवसातील किती तरी तास करत असतो.

मात्र, एकदा हातातील फोन खाली ठेवला की, मग चंचल निद्राराणी कधी प्रसन्न होते ते कळतही नाही. गुगलने मात्र हा शांत झोपेचा विषयसुद्धा मोकळा सोडायचा नाही असे ठरवले असावे. या संशोधनाला गुगलने स्लीप ऑडिओ कलेक्शन असे नाव दिले आहे. सुरुवातीला यात गुगलमध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांना सहभागी करून घेतले जाईल. त्यांच्यावर एका विशेष तंत्रज्ञानाद्वारे नजर ठेवली जाणार आहे. त्याद्वारे संबंधित व्यक्तीच्या झोपेचे देखील विश्लेषण केले जाईल. अर्थात, त्यासाठी कंपनीने काही अटी ठेवल्या आहेत. जसे की, या तंत्रज्ञानाचा वापर करताना एका खोलीत एकाच व्यक्तीने झोपणे आवश्यक आहे. त्यानंतर संबंधिताच्या निद्राकाळातील लेखाजोखाच उपलब्ध होईल. यातून झोपेच्या तक्रारी असणार्‍या लोकांना बारीक-सारीक तपशील सहज मिळू शकतील. तंत्रज्ञानाची ही किमया अजबच म्हटली पाहिजे.

Back to top button