घरबसल्या आकाशातून मिळाला ‘खजिना’! | पुढारी | पुढारी

घरबसल्या आकाशातून मिळाला ‘खजिना’! | पुढारी

जकार्ता : ‘भगवान देता है तो छप्पर फाड के’ असे म्हटले जाते ते काही खोटे नाही. त्याचा अक्षरशः अनुभव इंडोनेशियातील एका माणसाला आला. शवपेट्या बनवण्याचा व्यवसाय करणार्‍या 33 वर्षांच्या जोसुआ हुतागलुंग याला घरबसल्या आकाशातून घराचे छप्पर फाडून आलेला ‘खजिना’ मिळाला. त्याच्या घरात आकाशातून मोठी उल्का कोसळली आणि आता या उल्केमुळे त्याला दहा कोटी रुपये मिळाले आहेत! ही सुमारे साडेचार अब्ज वर्षांपूर्वीची दुर्मीळ उल्का आहे.

ही उल्का कोसळली त्यावेळी जोसुआ उत्तर सुमातातील कोलांग येथे असलेल्या आपल्या घराजवळच काम करीत होता. या उल्केमुळे त्याच्या घराच्या छताला मोठे भोक पडले व ती जमिनीवर कोसळून तिथे रुतून बसली. तिचा वेग इतका होता की जमिनीत पंधरा सेंटीमीटर खोलीवर ती रुतली. आकाशातून आलेल्या या उल्केने जोसुआवर जणू धनवर्षावच केला. या उल्केच्या मोबदल्यात त्याला चौदा लाख पौंड म्हणजेच सुमारे दहा कोटी रुपये मिळाले आहेत. ही उल्का 4.5 अब्ज वर्षांपूर्वीची व अत्यंत दुर्मीळ प्रकारातील आहे. तिची किंमत 857 डॉलर प्रतिग्रॅम आहे. जोसुआने जमिनीत घुसलेली ही उल्का खोदून बाहेर काढली. त्यावेळी ती गरम होती व थोडी भंगलेलीही होती. ही उल्का कोसळत असताना तिचा आवाज इतका मोठा होता की त्याचे घर हादरून गेले. या उल्केने मला इतका पैसा मिळवून दिला आहे जो मिळवण्यासाठी मला तीस वर्षे मेहनत घ्यावी लागली असती.

 

Back to top button