थ्रीडी प्रिंटरच्या सहाय्याने पाच दिवसांत बनवले घर! | पुढारी

थ्रीडी प्रिंटरच्या सहाय्याने पाच दिवसांत बनवले घर!

चेन्‍नई : आयआयटी-मद्रासच्या माजी विद्यार्थ्यांनी थ्रीडी प्रिंटरच्या सहाय्याने अवघ्या पाच दिवसांमध्येच सिमेंट काँक्रिटचे सुंदर घर बनवले आहे. चेन्‍नई कॅम्पसमध्ये 600 चौरस फूट जागेत अशा पद्धतीचे हे पहिलेच घर उभे राहिले आहे. हे घर बनवण्यासाठी पारंपरिक पद्धतीच्या घराच्या तुलनेत तीस टक्के कमी खर्च आला.

या घराचे वैशिष्ट म्हणजे त्याची संकल्पना, डिझाईन यापासून ते सजावटीपर्यंत सर्व काही ‘मेड इन इंडिया’ आहे. बांधकाम क्षेत्रात हे एक क्रांतिकारक तंत्रज्ञान ठरू शकते. भविष्यात स्वस्त आणि मजबूत घरे बनवण्यासाठी ‘बिल्ड’ च्या ऐवजी ‘प्रिंट’ हा शब्द वापरला जाऊ शकतो. शिवाय यासाठी वेळही अत्यंत कमी लागतो. या घराच्या निर्मितीसाठी एक विशाल थ्रीडी प्रिंटर वापरण्यात आला. तो कॉम्प्युटराईज्ड थ्री डायमेन्शनल डिझाईन फाईलला स्वीकारून आऊटपूट देते. हे तंत्रज्ञान आयआयटी मद्रासच्या मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या तीन माजी विद्यार्थ्यांनी विकसित केले आहे. आदित्य व्हीएस (सीईओ), विद्याशंकर सी (सीओओ) आणि परिवर्तन रेड्डी (सीडीओ) या तीन माजी विद्यार्थ्यांच्या ‘टीवास्ता मॅन्युफॅक्चरिंग सोल्युशन’ या स्टार्टअपने हे तंत्र विकसित केले आहे. त्यांनी घराच्या वेगवेगळ्या भागांना आधी वर्कशॉपमध्ये प्रिंट केले आणि क्रेनच्या माध्यमातून चेन्‍नई कॅम्पसमध्ये जोडले. या घरात एक बेडरूम, हॉल, किचन आणि अन्य सुविधा आहेत. विद्याशंकर यांनी सांगितले की या तंत्राने एक हजार चौरस फुटांचे घर केवळ दोन ते अडीच आठवड्यांमध्येच उभे केले जाऊ शकते.

 

Back to top button