

प्रेम विवाह केल्याच्या रागातून सख्या भावाने विवाहित बहिणीवर धारदार विळ्याने वार करून गंभीर जखमी केले. ही घटना पन्हाळा येथील तीन दरवाजा च्या पायथ्याशी असणाऱ्या गुडे या गावात शुक्रवारी (दि.६) सकाळी घडली.
पन्हाळा पोलिसातून मिळालेली माहिती अशी, की विश्रांती चिखलकर हिने गुडे गावातील अविनाश चिकलकर याच्याशी प्रेम विवाह केला आहे.
याचा राग अनावर झाल्याने विश्रांतीचा सख्खा भाऊ नागेश पांडुरंग तेली (वय २०, रा.निगवे दुमाला, ता.करवीर) याने गुडे येथे येऊन विश्रांती हिच्या पाठीत आणि दोन्ही हातावर धारदार विळ्याने वार करून गंभीर दुखापत केली. जखमी विश्रांती हिला पन्हाळा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
या बाबत जखमी विश्रांती चिखलकर यांनी पन्हाळा पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. याची दखल घेत पन्हाळा पोलिसांनी घटना घडल्या पासून दोन तासात सापळा लावून संशयित आरोपीस निगवे येथील घरातून ताब्यात घेतले. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक डोईफोडे हे करत आहेत.