कोरोनामुळे स्थगित झालेली आयपीएल सप्टेंबर १९ पासून संयुक्त अरब अमिरातीमध्ये पुन्हा सुरु होत आहे. यंदा मात्र कोरोनाचा शिरकाव आयपीएलमध्ये होऊ नये म्हणून बीसीसीआयकडून जय्यत तयारी सुरु करण्यात आली आहे. बीसीसीआयने तब्बल ४६ पानी आरोग्य मार्गदर्शक तत्वे प्रसिद्ध केली आहेत.
ही मार्गदर्शक तत्वांचे आयपीएलशी निगडीत असणाऱ्या सर्वांनाच पालन करणे बंधनकारक आहे. सर्व फ्रेंचायजींना बायो बबलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी सहा दिवस सक्तीचे क्वारंटाईन व्हावे लागणार आहे. पण, काही खेळाडूंना यात सूट मिळणार आहे. बीसीसीआयने यासाठी १४ बायो बबल तयार केले आहेत. या १४ पैकी ८ बायो बबल फ्रेंचायजींसाठी असणार आहेत.
याबाबत प्रसिद्ध झालेल्या आरोग्य विषयक मार्गदर्शक तत्वांमध्ये 'एकूण १४ बायो बबल तयार करण्यात येणार आहेत. त्यातील ८ बायो बबल हे फ्रेंचायजींसाठी असणार आहेत. त्यात संघ, सहाय्यक स्टाफ, यांचा समावेश आहे. तर ३ बायो बबल समालोचक आणि त्यांच्या टीमसाठी असणार आहेत. तसेच सामना अधिकारी आणि मॅच मॅनेजमेंट यांच्यासाठी ३ बायो बबल असणार आहेत.'
याचबरोबर 'सर्व आयपीएल फ्रेंचायजी संघांना ६ दिवसांचे हॉटेल रुममध्ये क्वारंटाईन सक्तीचे असणार आहे. त्यानंतर ते बायो बबलमध्ये प्रवेश करु शकतात. ज्यावेळी ते येणार आणि सांघित सराव सरु करणार त्यावेळी संघातील सर्व सदस्यांना आरटी पीसीआर चाचणीचे सर्व निमय पाळणे बंधनकारक असणार आहे. या चाचणीचे अहवाल ८ ते १२ तासात मिळणार आहेत.
तसेच आयपीएल २०२१ बायो बबलमधील सर्व सदस्य ठरवून दिलेल्या गाडीमधूनच प्रवास करतील. या गाड्या वेळचेवेळी सॅनिटाईज केल्या जातील. या गाडीवरील सर्व चालक देखील त्यांच्या बायो बबलमध्येच राहतील. त्यांचीही वेळोवेळी कोरोना चाचणी होणार आहे.
पण, जे खेळाडू सपोर्ट स्टाफ कॅरेबियन प्रिमीयर लीगमधून येतील त्यांना थेट त्यांच्या त्यांच्या बायो बबलमध्ये प्रवेश दिला जाईल. अशीच मुभा इंग्लंड, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असलेल्या खेळाडूंनाही देण्यात आली आहे. त्यांना क्वारंटाईन सक्तीचे करण्यात आलेले नाही.
मात्र आयपीएल २०२१ मध्ये पत्रकार आणि चाहत्यांसाठी कोणताही बायो बबल तयार करण्यात आलेला नाही. आयपीएल २०२१ चा उर्वरित हंगाम हा मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या हाय व्होल्टेज सामन्याने सुरु होणार आहे.
हेही वाचले का?
पाहा व्हिडिओ : सोनपरी मृणाल कुलकर्णी यांच्याशी खास गप्पा