नासाचे यान बेन्‍नूवरून पृथ्वीकडे झाले रवाना | पुढारी

नासाचे यान बेन्‍नूवरून पृथ्वीकडे झाले रवाना

वॉशिंग्टन : पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली, जीवन कसे अस्तित्वात आले, या प्रश्‍नांची उत्तरे शोधण्यासाठी अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’चे ‘ओसिरिस- रेक्स’ हे अवकाश यान 2018 मध्ये ‘बेन्‍नू’ नामक लघुग्रहावर पोहोचले होते. नासाने या अवकाश यानाच्या मदतीने या लघुग्रहाचा अभ्यास केला. याबरोबरच गेल्या ऑक्टोबरमध्ये ओसिरिस रेक्सने बेन्‍नूचे नमुने गोळा केले. आता हे अवकाश यान पृथ्वीच्या दिशेने रवाना झाले आहे. ते दोन वर्षांच्या प्रवासानंतर पृथ्वीवर पोहोचणार आहे.

नासाने दिलेल्या माहितीनुसार ‘ओसिरिस-रेक्स’ यानाने आता बेन्‍नूला सोडले आहे. सात मिनिटांचे इंजिन फायर करून ताशी 600 मैल वेगाने ते तेथून बाहेर पडले. पृथ्वीवर पोहोचण्यासाठी ओसिरिस-रेक्सला तब्बल दोन वर्षे लागणार आहेत. ते 24 सप्टेंबर 2023 रोजी पृथ्वीवर उतरण्याची शक्यता आहे. सध्या तरी या यानाला सुरक्षितपणे पृथ्वीवर आणण्याच्या प्रयत्नात नासाचे शास्त्रज्ञ आहेत. त्याला जमिनीवर उतरवण्यासाठी योग्य कोनात आणणे अवघड आणि आव्हानात्मक आहे. ओसिरिस-रेक्स यान थेट पोहोचले, तर ते वातावरणात घर्षणामुळे जळून खाक होण्याची शक्यता आहे. कमी कोणात आणले, तर ते वातावरणातला स्पर्शून पुन्हा अवकाशात परतण्याची शक्यता आहे. पृथ्वीजवळ आल्यानंतर त्याचे ‘सॅम्पल रिटर्न कॅप्सूल’ वेगळे होईल आणि ते पृथ्वीच्या वातावरणातून पॅराशूटच्या मदतीने जमिनीवर पोहोचेल. जमिनीवर पोहोचल्यानंतर कॅप्सूलला ह्यूस्टनस्थित जॉन्सन स्पेस सेंटरमध्ये घेऊन जाण्यात येईल. तेथे त्यातील नमुने गोळा करण्यात येतील.

 

Back to top button