जिवंतपणीच करून घेतले अंत्यसंस्कार! | पुढारी | पुढारी

जिवंतपणीच करून घेतले अंत्यसंस्कार! | पुढारी

सँतियागो : चिलीमध्ये एका महिलेने स्वतःच्याच अंत्यसंस्काराचे विधी करवून घेतले. आपल्या या ‘फेक’ अंत्यसंस्कारासाठी तिने तब्बल 710 पौंडस् म्हणजेच सुमारे 75 हजार रुपये खर्च केले. 59 वर्षांच्या मायरा अलोंजो या सँतियागो शहरात राहतात. कोरोनामुळे होत असलेले मृत्यू पाहून त्यांनी जिवंतपणीच स्वतःवर अंत्यसंस्कार करवून घेण्याचे ठरवले. हा प्रकार अंत्यसंस्काराची ‘रंगीत तालीम’ होती असे त्यांचे म्हणणे आहे!

अंत्यसंस्काराची अशी रिहर्सल करण्याचे ठरवल्यावर त्यांनी आपल्या आप्तेष्ट व मित्र-मैत्रिणींनाही त्यासाठी तयार केले. त्या एका शवपेटीत काही तास पडून राहिल्या. त्यांच्याजवळ त्यांच्या प्रियजनांनी खोटे अश्रूही ढाळले. काही लोक या दरम्यान फोटोही काढत होते. एखाद्या खर्‍या अंत्यसंस्काराप्रमाणेच सर्व प्रकार करण्यात आला. शवपेटीत ही महिला पांढरा पोशाख परिधान करून झोपली होती आणि तिच्या नाकात चक्क कापूसही घातलेला होता! हे सर्व झाल्यानंतर मायरा यांनी सांगितले की आता खरोखरच मृत्यू झाला तर आपल्याला अंत्यसंस्काराची गरज नाही. सगळे विधी आपण जिवंतपणीच उरकून घेतलेले आहेत. कोरोनामुळे ज्याप्रकारे लोकांचा मृत्यू होत आहे ते पाहून आपण असे करण्याचे ठरवले होते. अर्थातच महामारीच्या या भीषण काळात मायराने केलेली ही ‘नौटंकी’ पाहून अनेक लोकांनी त्यावर टीकाही केली.

Back to top button