अमेरिकेत लसीचे दोन्ही डोस घेतल्यावर वृद्धांची लगीनघाई | पुढारी

अमेरिकेत लसीचे दोन्ही डोस घेतल्यावर वृद्धांची लगीनघाई

वॉशिंग्टन ः कोरोना महामारीमुळे त्रस्त झालेल्या लोकांना आता लसीकरणामुळे दिलासा मिळालेला आहे. अमेरिकेत तर मोठ्या प्रमाणात लसीकरण झालेले आहे. विशेष म्हणजे लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या तेथील अनेक वृद्ध लोकांनी आता लग्‍न करून पुन्हा संसार थाटण्याचीही तयारी केली आहे. एका आजोबांनी तर 4270 किलोमीटरचे अंतर कापून एका महिलेशी लगीनगाठ बांधली!

कोरोना लस घेतल्यानंतर या संसर्गापासून आपण आता सुरक्षित झालो आहे, अशी लोकांची भावना होत असल्याने जीवनाकडेही ते नव्या द‍ृष्टीने पाहू लागले आहेत. कोरोना महामारीत लॉकडाऊनच्या काळात अनेकांना एकट्यानेच दिवस कंठावे लागले होते. त्यामुळे अशा लोकांना जोडीदाराची गरजही प्रकर्षाने वाटली. विशेषतः अनेक वयस्कर लोकांनी आता लग्‍न करण्याचे ठरवलेले दिसून येत आहे. अमेरिकेतील डेटिंग साईटवर वृद्धांची संख्या त्यामुळेच वाढली आहे. सुमारे पंधरा टक्क्यांनी या संख्येत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. दक्षिण अमेरिकेतील साठ वर्षांच्या स्टीफन पास्की या आजोबांनी तर दोन्ही डोस घेतल्यावर 4270 किलोमीटरचे अंतर पार करून मिस लेंज नावाच्या महिलेशी विवाह केला. या मिस लेंज कॅलिफोर्नियात राहतात.

Back to top button