थ्रीडी प्रिंटेड बायोरिअ‍ॅक्टरने बनवल्या मेंदूच्या उती | पुढारी

थ्रीडी प्रिंटेड बायोरिअ‍ॅक्टरने बनवल्या मेंदूच्या उती

चेन्‍नई ः आयआयटी मद्रास आणि मॅसाच्युसेटस् इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) मधील संशोधकांनी एका संयुक्‍त संशोधनात थ्रीडी प्रिंटेड बायोरिअ‍ॅक्टरच्या मदतीने मानवी मेंदूत आढळणार्‍या उती विकसित करण्यात यश मिळवले. या उतींना ‘ऑर्गेनाईडस्’ असे म्हटले जाते. 

संशोधकांनी म्हटले आहे की या प्रयोगात वापरलेला थ्रीडी प्रिंटेड बायोरिअ‍ॅक्टर अल्झायमर्स किंवा पार्किन्सनसारख्या मेंदूच्या विकारांवरील तसेच कर्करोगावरील उपचाराबाबतच्या संशोधनात उपयुक्‍त ठरू शकतो. आयआयटी मद्रासने दिलेल्या माहितीनुसार हा थ्रीडी प्रिंटेड बायोरिअ‍ॅक्टर या संशोधनाशी निगडीत संशोधकांनी विकसित केला आहे. मेंदूतील उती विकसित होण्याची कार्यप्रणाली यामधून समजून घेता येऊ शकते. आयआयटी मद्रासच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील प्राध्यापक अनिल प्रभाकर यांनी सांगितले की गेल्या वर्षभरापासून आम्ही यावर संशोधन करीत आहोत. आमच्याकडे या संशोधनासाठी उपयुक्‍त ‘क्लास-3’ प्रयोगशाळा नव्हती. त्यासाठी आम्हाला ‘एमआयटी’कडून मदत मिळाली. या संशोधनाचे अन्य काही निष्कर्ष भविष्यात समोर येऊ शकतात. या संशोधनाची माहिती ‘बायो मायक्रोफ्लुडिक्स’मध्ये प्रकाशित करण्यात आली आहे.

Back to top button