मंगळावर  होणार ‘इंजिन्युटी’चे सातवे विशेष उड्डाण | पुढारी

मंगळावर  होणार ‘इंजिन्युटी’चे सातवे विशेष उड्डाण

वॉशिंग्टन : अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने पर्सिव्हरन्स रोव्हरबरोबर मंगळावर पाठवलेले ‘इंजिन्युटी’ हे छोटे हेलिकॉप्टर (रोटरक्राफ्ट) अनेक भरार्‍या घेत आहे. आता या 1.8 किलो वजनाच्या हेलिकॉप्टरने सातव्यांदा मंगळाच्या आसमंतात भरारी घेण्याची तयारी केली आहे. ‘नासा’ या आठवड्यात ‘इंजिन्युटी’ हेलिकॉप्टरला एका नव्या एअरफिल्डमध्ये पाठवण्याची तयारी करीत आहे. हे हेलिकॉप्टर आता जेजेरो क्रेटरमधील त्याच्या सध्याच्या ठिकाणापासून दक्षिणेस 105 मीटर दूर पाठवले जाईल.

‘नासा’च्या अधिकार्‍यांनी म्हटले आहे की उड्डाणानंतर तीन दिवसांनी त्याचा डेटा पृथ्वीवर पाठवला जाईल. ज्याठिकाणी इंजिन्युटीने आधी उड्डाण केले नव्हते अशा ठिकाणी त्याचे उड्डाण होण्याची ही दुसरी वेळ असेल. त्याच्यासाठी जे ठिकाण शोधले आहे ते ‘मार्स रिकनायसन्स ऑर्बिटर’ने पाठवलेल्या छायाचित्रांमधून निवडलेले आहे. ते अधिक सपाट व कमी अडथळ्यांचे आहे. यापूर्वी इंजिन्युटीने 22 मे रोजी आपल्या सहाव्या उड्डाणावेळी एका नव्या हवाई क्षेत्रात भरारी घेतली होती. त्यावेळी हेलिकॉप्टरमधील एका बिघाडामुळे त्यावरील नेव्हिगेशन कॅमेर्‍याने टिपलेल्या छायाचित्रात थोडा वेळ बाधा आली. मात्र, हेलिकॉप्टर निर्धारित ठिकाणी सुरक्षित उतरले होते.

Back to top button