‘ते’ सोन्याच्या शाईने लिहीत आहेत श्री गुरू ग्रंथ साहिब | पुढारी

‘ते’ सोन्याच्या शाईने लिहीत आहेत श्री गुरू ग्रंथ साहिब

भटिंडा : ‘मनकीरत’ शब्दाचा अर्थ आहे ‘मन लावून कीरत म्हणजेच काम करणारा’. भगता भाई येथील गुरसिख मनकीरत सिंह आपल्या नावाप्रमाणेच गुरुसेवेचे कार्य करीत आहेत. ते सोन्याच्या शाईने श्री गुरू ग्रंथ साहिब लिखित आहेत. 2018 मध्ये त्यांनी या कार्यास सुरुवात केली असून पाच वर्षांनी त्यांचे हे लेखन पूर्ण होईल.

2018 मध्ये ते एका खासगी शाळेत शिक्षक होते. आपले सर्व वेतन ते या कामात खर्च करीत असत. कोरोना महामारीमुळे वेतन मिळणे बंद झाल्यावर त्यांनी नोकरीही सोडून दिली. मात्र, त्यांची आपल्या स्वीकारलेल्या सेवेवरील निष्ठा कमी झाली नाही. आता ते उपजीविकेसाठी दुसरे काम करीत असून मिळालेल्या कमाईचा मोठा हिस्सा ते याच कामासाठी वापरतात. कोरोनाच्या संकटामुळे त्यांच्या या कामात बरीच बाधा आली. त्यांना काही लोकांचा सहयोग मिळत होता तो थांबला. शिवाय जे साहित्य त्यांना लखनौ, दिल्‍ली, राजस्थान व काश्मीरमधून मागवावे लागत होते, ते बाजार बंद राहिल्याने मिळणे कठीण झाले.

मनकीरत यांच्या माहितीनुसार हे काम पूर्ण करण्यासाठी सुमारे 30 ते 35 लाख रुपये खर्च येणार आहे. मात्र, आपण न डगमगता हे काम पूर्ण करूच, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्‍त केला आहे. आतापर्यंत त्यांनी 250 पानांचे लेखन केले आहे. एक पान पूर्ण करण्यासाठी त्यांना सहा ते सात तास लागतात. विजयसार नावाच्या औषधी गुणधर्म असलेल्या रोपाच्या काडीपासून बनलेला बोरू ते वापरतात. सोने आणि लाजवर्द (मौल्यवान निळ्या रंगाचा खडा) यांचे समसमान भाग असलेली विशिष्ट शाई ते वापरतात. त्यापासून लिहिलेली अक्षरे कमी प्रकाशातही चमकतात.

 

Back to top button