अंतराळात सर्वात मोठ्या जैविक रेणूचा शोध | पुढारी

अंतराळात सर्वात मोठ्या जैविक रेणूचा शोध

न्यूयॉर्क : खगोल शास्त्रज्ञांनी अंतराळात ग्रह बनवण्यासाठी उपयुक्त ठरणार्‍या धुळीच्या ढगांमध्ये आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या ऑर्गेनिक मॉलेक्यूलचा म्हणजेच जैविक रेणूचा शोध घेतला आहे. ग्रहांवरील जीवसृष्टीसाठीच्या ‘बिल्डिंग ब्लॉक्स’ म्हणजेच महत्त्वाच्या घटकांबाबतच्या अधिक संशोधनासाठी हा शोध महत्त्वाचा आहे.

चिलीमधील अटाकामा लार्ज मिलीमीटर/ सबमिलीमीटर अ‍ॅरे (एएलएमए) टेलिस्कोपचा वापर करून हा शोध लावण्यात आला. ‘आयआरएस 48’ असे नाव असलेल्या कमी वयाच्या तार्‍याभोवती असलेल्या धूळ आणि बर्फाच्या कडीमधील काही रेणू प्रकाश उत्सर्जित करीत होते. संशोधकांनी दुर्बिणीच्या सहाय्याने त्यांचा अभ्यास केला.

थ्वीपासून 444 प्रकाशवर्ष अंतरावर ‘ऑफिचस’ तारकापुंजात हा तारा आहे. या धुळीच्या कडीमध्ये संशोधकांना ‘डायमिथिल इथर’ या जैविक संयुगाचे स्पष्ट संकेत मिळाले. नवी तार्‍यांची जिथे निर्मिती घडते अशा थंड, धुळीच्या अवकाशीय भागात हा मोठा रेणू सहसा सापडत असतो. अमिनो अ‍ॅसिड आणि शर्करेसारख्या जीवसृष्टीसाठी महत्त्वाच्या घटकांच्या निर्मितीसाठी ते आवश्यक असते.

Back to top button