नाशिककरांवर पाणीकपातीचे संकट, सोमवारच्या आरक्षण बैठकीत होणार फैसला

नाशिककरांवर पाणीकपातीचे संकट, सोमवारच्या आरक्षण बैठकीत होणार फैसला
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; नाशिकमधील दारणा धरणसमूहातून २.६४ तर गंगापूर धरण समुहातून ०.५ टीएमसी पाणी सोडण्याच्या गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या निर्णयामुळे नाशिककरांवर पाणीकपातीचे संकट गडद बनले आहेत. गंगापूर, मुकणे व दारणा धरणातून नाशिककरांना पिण्यासाठी महापालिकेने यंदा ६१०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षणाची मागणी केली असली तरी, विसर्गानंतर धरणांमध्ये शिल्लक राहणारा पाणीसाठा लक्षात घेऊनच आरक्षण निश्चित होणार असल्याने येत्या सोमवारी, दि. ६ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या आरक्षण बैठकीकडे नाशिककरांच्या नजरा लागल्या आहेत.

यंदा समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील धरणं जेमतेम भरली असली तरी या धरणांमधून होणाऱ्या विसर्गावर आधारीत असलेले मराठवाड्यातील जायकवाडी धरणातील जलपातळी मात्र ४५ टक्क्यांवर जाऊ शकली नाही. त्यामुळे मेंढिगिरी समितीच्या समन्यायी पाणी वाटपाच्या अहवालानुसार नाशिक व नगरमधील धरणांतून जायकवाडीसाठी ८.६० टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने दिले आहेत. दरवर्षी धरणांमधील १५ आॉक्टोबर रोजीच्या जलसाठ्यानुसार पाणी आरक्षण निश्चित केले जात असते. पाणी आरक्षणाचा हा कालावधी १५ आॉक्टोबर ते ३१ जुलै असा असतो. गतवर्षी महापालिकेसाठी गंगापूर, मुकणे व दारणा धरणांतून एकूण ५८०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण मंजूर करण्यात आले होते. यंदा गंगापूर धरण समूहातून ४४००, मुकणेतून १६०० तर दारणातून १०० अशाप्रकारे एकूण ६१०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षणाची मागणी महापालिकेने जिल्हा प्रशासनाकडे नोंदविली आहे. मात्र नाशिकमधील दारणा धरण समुहातून २.६४ टीएमसी तर गंगापूर धरण समुहातून ०.५ टीएमसी पाणी जायकवाडीसाठी सोडण्याच्या गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या निर्णयामुळे महापालिकेच्या पाणी आरक्षणात घट होण्याची शक्यता आहे.

नाशिक व नगरच्या धरणातून जायकवाडीसाठी विसर्ग करण्याच्या निर्णयास भाजपच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी कडाडून विरोध दर्शविला आहे. पाण्यावरून संघर्ष उभा राहण्याची चिन्हे लक्षात घेता विसर्गाच्या आदेशास स्थिगिती मिळण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. मात्र अद्यापही स्थगितीचे कुठलेही आदेश प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे विसर्ग झाल्यास धरणांमध्ये शिल्लक राहणाऱ्या जलसाठ्यातूनच आरक्षण निश्चित होईल. परिणामी महापालिकेला अपेक्षित आरक्षित जलसाठा मिळण्याची शक्यता कमी असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

दहा टक्के पाणीकपातीची शक्यता

नाशिक शहराला प्रामुख्याने गंगापूर धरण समुहातून तर काही प्रमाणात मुकणे, दारणा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. यंदा मनपाने गंगापूर धरण समूहातून ४४०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षणाची मागणी केली आहे. या धरणातून ०.५ टीएमसी पाणी जायकवाडीसाठी सोडावे लागणार असल्याने उर्वरित साठ्यातून एकलहरे, एमआयडीसी व शेतीसाठीचे आरक्षण वगळता मनपाची अपेक्षित मागणी पूर्ण होणे अवघड आहे. दारणेतून १०० तर मुकणेतून १६०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षणाची मागणी आहे. मुकणे धरण हे दारणा धरण समुहाचाच भाग आहे. दारणा धरण समुहातून तब्बल २.६४ टीएमसी पाणी जायकवाडीसाठी सोडले जाणार असल्याने मुकणे धरणातून अपेक्षित पाणी आरक्षणात मोठी कपात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाशिककरांना किमान दहा टक्के पाणीकपात सोसावी लागण्याची शक्यता असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news