Nashik News : द्वारका ते नाशिकरोड डबलडेकर उड्डाणपुलास हिरवा कंदिल | पुढारी

Nashik News : द्वारका ते नाशिकरोड डबलडेकर उड्डाणपुलास हिरवा कंदिल

नाशिक: पुढारी वृत्तसेवा; निओ मेट्रो प्रकल्प अद्यापही केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीच्या प्रतिक्षेत असताना या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या द्वारका ते दत्तमंदिर (नाशिकरोड) दरम्यान डबलडेकर उड्डाणपुलाला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) तथा नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी हिरवा कंदिल दिला आहे. या पुलासाठी सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्याचे निर्देश भुसे यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले.

नाशिक- पुणे महामार्गावरील वाहनांची वर्दळ आणि त्यामुळे द्वारका चौकात होणारी वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी सागरमाला प्रकल्पांतर्गत उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यानंतर देशातील पहिल्या टायर बेस निओ मेट्रो प्रकल्पाची घोषणा झाल्यानंतर निओ मेट्रो देखील द्वारका ते दत्तमंदिर मार्गानेच धावणार असल्याने या प्रकल्पासाठी द्वारका ते नाशिकरोड दरम्यान, डबल डेकर उड्डाणपुल उभारण्याचा निर्णय केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी घेतला होता. या उड्डाणपुलासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात तरतूद देखील करण्यात आली होती. मात्र, या प्रकल्पासाठी नाशिकच्या लोकप्रतिनिधींचा दबावगट केंद्रात प्रभाव टाकू न शकल्याने या प्रकल्पासंदर्भातील प्रस्ताव गेल्या काही वर्षांपासून केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी प्रलंबित आहे. यासंदर्भात नाशिककरांकडून ‘दत्तकपिता’ तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारणा झाल्यानंतर त्यांनी केंद्राकडे प्रस्ताव पाठवत प्रकल्पाचा पहिला टप्पा राज्याच्या अखत्यारीत पूर्ण करण्यासाठी परवानगी मागितली होती. या प्रस्तावाचेही पुढे काय झाले हे अद्याप नाशिककरांना अद्याप उमगेलेले नाही. मात्र या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या द्वारका ते नाशिकरोड दरम्यानच्या डबल डेकर उड्डाणपुलासाठी बुधवारी(दि.१) सार्वजनिक बांधकाम मंत्री(सार्वजनिक उपक्रम) भुसे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक पार पडली. त्यात निओ मेट्रो प्रकल्पाला अद्यापही केंद्राची मंजुरी नसल्याचे मेट्रोच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आल्याने डबलडेकर पुल तयार करायचा तरी कसा व कशासाठी असा प्रश्न निर्माण झाला. मात्र प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर डबलडेकर पुल गरजेचा असल्याने प्रकल्पाचे डिझाईन तयार करण्याच्या सुचना ना. भुसे यांनी दिल्या. या बैठकीस राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे भाऊसाहेब साळुंखे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, शहर अभियंता शिवकुमार वंजारी, कार्यकारी अभियंता संदेश शिंदे, आदी उपस्थित होते.

सागरमाला प्रकल्पात समावेश

सागरमाला प्रकल्पांतर्गत नाशिक-पुणे रोडवरील द्वारका ते नाशिकरोड हा सात किलोमीटर लांबीचा भाग समाविष्ट आहे. या महामार्गावर मोठ्या प्रमाणावर नागरी वाहतुकीसह अवजड वाहतुक होत असते. विषम वाहतुकीमुळे या महामार्गावर नेहमीच अपघात आणि गर्दी होत असते. त्यामुळे या रस्त्यावर उड्डाणपुलाचे काम तातडीने हाती घेणे आवश्यक आहे. महामेट्रोकडे निओ मेट्रोची अंतिम मंजुरी प्रस्तावित आहे.

हेही वाचा :

Back to top button