Pune University : पुणे विद्यापीठात विद्यार्थी भिडले! सभासद नोंदणीवरून अभाविप-एसएफआय आमने-सामने
पुणे; पुढारी वृत्तसेवा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) आणि स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) या दोन संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये बुधवारी तुंबळ हाणामारी झाली. विद्यार्थी नोंदणीवरून या दोन संघटनांमध्ये चांगलाच राडा झाला. त्यामुळे दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) धर्तीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातही विद्यार्थी संघटनांमधील तीव्र संघर्ष समोर आला आहे.
विद्यापीठाच्या भोजनगृृहाजवळ हा प्रकार घडला. विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या सदस्य नोंदणीवरून स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया आणि अभाविप यांच्यात वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यात एका विद्यार्थ्याला दुखापत झाली. या मारामारीनंतर विद्यापीठाच्या सुरक्षा विभागाने पोलिसांना पाचारण केले. पोलिसांकडून दोन्ही संघटनांची बाजू ऐकून घेण्यात येत असल्याची माहिती विद्यापीठातील सुरक्षा विभागाकडून देण्यात आली.
अचानक हल्ला झाला : एसएफआय
विद्यापीठामध्ये एसएफआयची सभासद नोंदणी सुरू होती. यावेळी अभाविपच्या गुंडांनी अचानक येऊन एसएफआयच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात एसएफआयचे राज्य अध्यक्ष व केंद्रीय कमिटी सदस्य सोमनाथ निर्मळ, शहर सचिव अभिषेक शिंदे, गणेश जानकर या कार्यकर्त्यांना मार लागला आहे. इतर कार्यकर्त्यांनासुद्धा मुका मार लागला आहे. गुंड प्रवृत्तीची अभाविप कायम असे हिंसक कृत्य करत आली आहे. त्यांनी त्यांच्या गुंड संस्कृतीची पुनरावृत्ती केली आहे. काहीही कारण नसताना, शांततेत एसएफआयचा सभासद नोंदणी कार्यक्रम सुरू होता. घोळक्याने येऊन परवानगी घेतली का? असे विविध प्रश्न विचारून मारहाणीस सुरुवात केली. विद्यापीठ सुरक्षा विभागाने देखील फक्त बघ्याची भूमिका घेतली व नंतर मध्यस्ती केली असल्याचा आरोप एएसएफआय संघटनेच्या वतीने करण्यात आला.
परवानगी शिवाय नोंदणी : अभाविप
विद्यापीठामध्ये एएसएफआय, लोकायत व इतर डाव्या विचारांच्या संघटनांची परवानगीशिवाय सदस्य नोंदणी सुरू होती. विद्यापीठामध्ये हजारो विद्यार्थी खिचडी खाण्यासाठी येत असतात. खिचडी खायला आलेल्या विद्यार्थ्यांकडून जबरदस्तीने व दमदाटीने संबंधित विद्यार्थी संघटना सदस्य करून घेत होत्या. या वेळी काही विद्यार्थ्यांनी सदस्यता करायला नकार दिल्यावर संबंधित संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सामान्य विद्यार्थ्यांना मारहाण करायला सुरुवात केली.
या मारहाणीमध्ये विद्यार्थी जबर जखमी झाले असून एका विद्यार्थ्याच्या कपाळावर मोठी जखम झाली आहे. यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी मध्यस्थी करून पोलिसांना संपर्क केला व पीडित विद्यार्थ्यांना उपचारासाठी दवाखान्यात नेले. अशा संघटनांवर लवकरात लवकर प्रशासनाने कारवाई करावी व संबंधित दोषींवर कठोर कारवाई करून त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करावे. विद्यार्थ्यांवर दमदाटी करायचा अधिकार कोणालाही नाही, तसे होत असल्यास अभाविप सामान्य विद्यार्थ्यांसोबत कायम उभी राहणार असल्याचे अभाविपने स्पष्ट केले आहे.
अभाविपचा आरोप खोटा
लोकायत संघटना ही संविधानिक मार्गाने काम करणारी व महात्मा गांधींच्या विचारांचा प्रसार करणारी संघटना आहे. लोकायत संघटना कोणत्याही प्रकारचे सदस्य नोंदणी अभियान चालवत नाही. त्यामुळे विद्यापीठात चालू असलेल्या सदस्य नोंदणी कार्यक्रमाशी लोकायत संघटनेचा काहीही संबंध नाही. अभाविपकडून लोकायत संघटनेच्या कार्यकर्त्यांवर केलेला आरोप हा पूर्णतः खोटा आहे, असे लोकायत संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे.
अभाविपची दादागिरी व गुंडगिरी मागच्या काही काळापासून खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांना अमानुषपणे लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली, त्याचा आम्ही निषेध करतो. विद्यापीठातील आणि शहरातील विद्यार्थी किंवा इतर संघटना असतील त्यांच्यासोबत आम्ही ताकदीने उभे आहोत याची खात्री देतो. यापुढे अशी गुंडगिरी सहन केली जाणार नाही.
– अक्षय जैन, चेअरमन,
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस (मीडिया विभाग)
हेही वाचा

