हमासनंतर उद्ध्वस्त गाझाचा वाली कोण? अमेरिकेची अरब देशांशी चर्चा सुरू | पुढारी

हमासनंतर उद्ध्वस्त गाझाचा वाली कोण? अमेरिकेची अरब देशांशी चर्चा सुरू

तेल अवीव : वृत्तसंस्था : हमासनंतर गाझावर कोणाचे सरकार राहील, या दिशेने अमेरिकेने अरब देशांशी चर्चा सुरू केली आहे. गाझावर कायमस्वरूपी नियंत्रण ठेवण्यात आपल्याला स्वारस्य नाही, असे इस्रायलने स्पष्ट केले असल्याचे अमेरिकन परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी सांगितले. अमेरिका त्यासाठी तात्पुरते सैन्यही पाठविणार नाही. वेस्ट बँकेतील पॅलेस्टिनी लिबरेशन ऑर्गनायझेशनही गाझावर प्रशासनास तयार नाही. गाझात शांती सेना तैनात करून संयुक्त राष्ट्रांच्या देखरेखीत अस्थायी सरकारची स्थापना होणे शक्य आहे, असे संकेतही ब्लिंकन यांनी दिले.

संबंधित बातम्या : 

गाझातील सर्वांत मोठ्या रहिवासी शिबिरावर हल्ला

इस्रायल आणि हमास युद्धाच्या २६ व्या दिवशी इस्रायली लष्कराने हमासची ११ हजार ठिकाणे उद्ध्वस्त केली. गाझाच्या उत्तरेतील सर्वात मोठे जबलिया रहिवासी शिविरही इस्रायली हल्ल्याचे लक्ष्य ठरले. हमासचा वरिष्ठ कमांडर इब्राहिम बियारी याच्यासह ५० जण ठार झाले, तर शेकडो लोक जखमी झाले आहेत. हमासच्या नियंत्रण- खालील गाझा आरोग्य मंत्रालयाने मात्र १२ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. इस्रायली लष्करातील २ सैनिकांचा यादरम्यान मृत्यू झाला.

मुस्लिम देशांच्या एकजुटीचे प्रयत्न गाझातील इस्रायली हल्ल्यांविरोधात मुस्लिम देशांनी एकवटावे म्हणून आता हालचालींना वेग आलेला आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री हुसैन आमीर तुर्कस्तानला दाखल झाले असून, अनेक बैठका येथे ते घेणार आहेत. इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फतेह अल सिसी यांनीही इस्रायल आणि पॅलेस्टाईन पूर्णपणे वेगळे देश म्हणून अस्तित्वात यावेत, यासाठी वैयक्तिक पातळीवर प्रयत्न सुरू केलेले आहेत. इस्रायलने गाझावरील हल्ले थांबवले नाहीत तर त्याचे परिणाम गंभीर होतील, असा इशारा तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष तय्यब अर्दोगॉन यांनी दिला आहे.

हुती बंडखोरांकडून इस्त्रायलवर क्षेपणास्त्रे

येमेनमधील हुती बंडखोरांनी इस्रायलवर क्षेपणास्त्र डागले. इस्रायलने ते हवेतच नष्ट केले. हुतीचा प्रवक्ता याह्या याने इलात शहरावर हुतीकडून ड्रोन हल्ल्यासह बॅलेस्टिक आणि क्रूझ क्षेपणास्त्रे डागण्यात आल्याचे कबूल केले आहे. गाझातील लोकांना पाठिंबा म्हणून आम्ही हे हल्ले केल्याचे तो म्हणाला. अरब देश लाचार, कमजोर आहेत. हे देश आतून इस्त्रायलच्या मागे आहेत, असा आरोपही याह्या याने केला. येमेनच्या सना या राजधानीसह देशातील मोठ्या भागावर हुतींचे नियंत्रण आहे, हे येथे उल्लेखनीय!

इंटरनेट सेवा ठप्प

गाझामध्ये दूरसंचार आणि इंटरनेट सेवा पुन्हा ठप्प झाल्या आहेत. गाझातील २० लाखांवर लोकांचा जगाशी संपर्क तुटलेला आहे. लेबनॉनमधून हिजबुल्लानेही इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला केला. उत्तरादाखल इस्रायली लष्कराने हिजबुल्लाच्या क्षेपणास्त्र लाँचिंग पॅडवर हल्ले चढविले.

गाझात १०० ट्रक्सना परवानगी

इस्त्रायल जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी दररोज १०० ट्रक्सना गाझातील प्रवेशास इस्रायलकडून परवानगी देण्यात आली आहे. सामान्य लोकांना मदत सामग्री मिळावी, हा यामागे आमचा हेतू आहे, असे इस्रायलने म्हटले आहे.

हेही वाचा : 

Back to top button