

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा: औरंगाबाद येथील शिवाजीनगर रेल्वे गेटला गुरुवारी (दि.३०) रोजी सकाळी वाहनाने धडक दिल्याने रेल्वे गेट जाम झाले आहे. गेट बंद झाल्याने चार तास वाहतुकीचा खोळंबा झाला. यानंतर दुपारी एक वाजल्यानंतर येथील वाहतूक सुरळीत सुरू झाली. दरम्यानच्या काळात वाहनधारकांना वळसा घालून बिडबायपासला जावे लागले.
गुरुवारी सकाळी जनशताब्दी एक्सप्रेस येत असताना रेल्वे गेट बंद करण्यात आले. एका चारचाकी वाहनाने गेटलाच धडक दिली. त्यामुळे आटोमॅटीक गेट लॉक झाले. गाडी गेल्यानंतरही गेट उघडत नसल्याने रेल्वे कर्मचाऱ्याची एकच धावपळ झाली. याची माहिती मिळताच तांत्रिक विभागाचे पथक घटनास्थळी दाखल होत दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.
तब्बल चार तासाच्या मेहनतीनंतर गेट वाहतुकीस खुले करण्यात आले. गेट बंद असल्याने याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. अनेकांनी वळसा घालून जाने पसंत केले. तर अनेक वाहनधारक गेट लवकरच होईल या आशेवर तेथेच थांबून होते. पण उशीर लागणार अशी माहिती मिळताच त्याही वाहनधारकांनी तेथून काढता पाय घेतला. घटनेची माहिती मिळताच आरपीएफच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ज्या वाहनाने गेटला धडक दिली होती ते वाहन आरपीएफने ताब्यात घेतले आहे. तर वाहनचालकांचा शोध सुरू असून त्यालाही ताब्यात घेणार असल्याची माहिती आरपीएफने दिली.
दरम्यान या ठिकाणी रोजच वाहनाची कोंडी होत असते. अशात रुळ दुरुस्ती किंवा गेटची दुरुस्ती असेल तर तासनतास गेट बंद राहिल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करण्याची वेळ येत आहे.
हेही वाचलंत का?