नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रपती निवडणुकीतील रालोआ आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आणि विरोधी आघाडीचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचे निवडणूक अर्ज वैध ठरले आहेत. याची माहिती राज्यसभा महासचिवालयाकडून गुरुवारी (दि.३० ) रोजी देण्यात आली.
राष्ट्रपती निवडणुकीसाठी एकूण ११५ लोकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यातील २८ अर्ज ज्यादिवशी आले होते, त्याच दिवशी रद्द ठरले होते असे राज्यसभेचे महासचिव पी. सी. मोदी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. तर ७९ अर्ज आवश्यक त्या मापदंडात बसत नसल्यामुळे रद्द करण्यात आले होते. यानंतर राष्ट्रपती निवडणुकीत रालोआ बहुमताच्या आसपास असल्याने या आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्चित मानला जात आहे.
या निवडणुकीसाठी उमेदवारांना कमीत- कमी ५० प्रस्तावक आणि ५० अनुमोदकांची आवश्यकता अनिवार्य करण्यात आलेली आहे. वर्ष १९९७ मध्ये म्हणजे ११ व्या राष्ट्रपती निवडणुकीआधी प्रस्तावक आणि अनुमोदकांची संख्या दहावरुन पन्नासपर्यंत वाढविण्यात आली होती.
हेही वाचलंत का?