सातारा : लोणंदमध्ये सर्वच पक्ष आमने-सामने

सातारा : लोणंदमध्ये सर्वच पक्ष आमने-सामने

Published on

लोणंद : शशिकांत जाधव

लोणंद नगरपंचायतीच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी दंड थोपटले आहेत. राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप, शिवसेना यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. नगरपंचयातीसाठी राजकीय डावपेचांना वेग आला आहे. त्यातून आघाडी अन् युतीचेही संकेत मिळत आहे. त्यामुळे लोणंद नगरपंचायतीची निवडणूक कोणाबरोबर कशी होणार? याची उत्सुकता आहे.

परंतु, तरीही सर्वच पक्ष एकमेकांसमोर आमने-सामने येण्याची चिन्हे आहेत. सेनाही आपली ताकत दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे.
दरम्यान, या निवडणुकीने लोणंदच्या राजकारणाची समीकरणे बदलणार आहेत. त्यामुळे लोणंदनगरीवर वर्चस्व ठेवण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष आपली प्रतिष्ठा पणाला लावणार आहेत .

लोणंद नगरपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर इच्छुकउमेदवार कामाला लागले आहेत. संभाव्य उमेदवारांची चाचपणी सर्वच पक्षांकडून केली जात असून बैठका सुरू झाल्या आहेत. कोणत्या प्रभागात कोणत्या समाजाची, कोणत्या पक्षाची, कोणत्या गटाची किती ताकत राहू शकते याचा अभ्यास केला जात आहे. पुढील काही दिवसात प्रत्येक पक्षाच्या बैठकांना वेग येणार असून आपापले कार्यकर्ते जागेवर ठेवण्याचा प्रयत्न नेत्यांकडून केला जाणार आहे.

गत पाच वर्षांतील लोणंद नगरपंचायतीच्या कारभाराचा झालेला खेळखंडोबा जनतेने पाहिला आहे. स्पष्ट बहुमताअभावी सत्तेसाठी कायपण हाच सारीपाट जिल्ह्यात गाजला होता. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी लोणंद शहरात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस हे पारंपारिक राजकीय शत्रू आहेत. आतापर्यंत दोन्ही पक्ष नेहमीच आमने-सामने राहिले आहेत. गत निवडणुकीतही काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप व शिवसेना अशी चौरंगी लढत झाली होती. त्यामध्ये राष्ट्रवादी 8, काँग्रेस 6, भाजप 2 व अपक्ष 1 असे नगरसेवक निवडून आले होते.

यंदा राष्ट्रवादीची सर्व सूत्रे आ. मकरंद पाटील यांच्या हातात राहणार आहेत. राष्ट्रवादीत इच्छुकांची संख्या मोठी असल्याने उमेदवारी ठरवताना आ. पाटील यांच्यासाठी डोकेदुखी ठरणार आहे. त्यातच राष्ट्रवादी अंतर्गत असणारी गटबाजी, हेवेदावे, मतभेद कळीचे मुद्दे ठरणार आहेत. या सर्वांची मोट कशी बांधली जाणार? यावरही राष्टवादीचे भवितव्य अवलंबून आहे. राष्ट्रवादी स्वबळाचा नारा देऊन निवडणुकीला सामोरे जाण्याची शक्यता आहे.

ज्येष्ठ नेते स्व. अ‍ॅड. बाळासाहेब बागवान यांच्याशिवाय काँग्रेस निवडणूक लढणार आहे. त्यामुळे काँग्रेसला आपली ताकत दाखवण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. स्व. बाळासाहेब बागवान यांचे चिरंजीव अ‍ॅड. सर्फराज बागवान यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस निवडणुकीला सामोरे जाणार आहे.

ज्येष्ठ नेते आनंदराव शेळके – पाटील यांच्या भाजपा प्रवेशाने भाजपाची ताकत वाढली आहे. त्यांच्याच नेतृत्वाखाली भाजप निवडणूक लढवणार आहे. शिवसेना नेत्यांनी स्वबळाचा नारा दिला असला तरी लोणंद शहरातील शिवसेनेची ताकत पाहता शिवसेना काही जागांवर आपले उमेदवार उभे करण्याची शक्यता आहे. दरम्यान, नगरपंचायतीवर सत्ता सहज मिळावी यासाठी आघाडी व युतीसाठी बोलणी सुरू आहेत. परंतु, इच्छुकांची असलेली भाऊगर्दी आणि पक्ष वाढवण्याच्या दृष्टीने आघाडी व युती कशी होणार? याकडे लक्ष लागून राहिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news