विधान परिषद निवडणूक : कोल्हापूरच्या उमेदवारी 'माघारीचे' धुळे 'कनेक्शन' - पुढारी

विधान परिषद निवडणूक : कोल्हापूरच्या उमेदवारी 'माघारीचे' धुळे 'कनेक्शन'

कोल्हापूर : सतीश सरीकर

काय??? महाडिकांनी माघार घेतली??? कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात शुक्रवारी हीच वाक्ये ऐकावयास मिळत होती. अखेर अमल महाडिक यांनी दुपारी उमेदवार ( विधान परिषद निवडणूक ) अर्ज मागे घेतला आणि त्यांच्या माघारीमागच्या नाट्यमय घडामोडी शोधल्या जाऊ लागल्या; पण मुंबईत गुरुवारी डॉ. सातव यांच्या बिनविरोध निवडीवेळीच कोल्हापूर भाजपच्या म्हणजेच अमल महाडिक यांच्या माघारीची पेरणी झाली होती. त्यानुसारच गुरुवारी रात्री व शुक्रवारी दुपारपर्यंत पडद्यामागे मोठ्या घडामोडी झाल्या. काँग्रेसचे उमेदवार व पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नाट्यपूर्ण बिनविरोध निवडीवर शिक्कामोर्तब झाले. कोल्हापुरातील महाडिकांच्या माघारीमागे धुळे कनेक्शन होते. माजी मंत्री, आ. विनय कोरे हे बिनविरोध निवड व माघारी नाट्याच्या केंद्रस्थानी होते.

कोल्हापूरसाठी काँग्रेस आग्रही… ( विधान परिषद निवडणूक )

सध्याची राजकीय स्थिती पाहता महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या ( विधान परिषद निवडणूक ) सर्व जागा बिनविरोध करण्यासाठी हालचाली सुरू होत्या. मुंबईतून त्याची सुरुवात झाली. दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांच्या विरोधातील उमेदवार भाजपने मागे घेऊन निवडणूक बिनविरोध करावी, अशी विनंती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मंत्री बाळासाहेब थोरात यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना केली. त्यांच्या विनंतीला मान देऊन भाजपने संजय केनेकर यांचा अर्ज मागे घेतला. या ठिकाणीच कोल्हापुरात भाजप उमेदवाराने अर्ज मागे घ्यावा, अशी चर्चा सुरू झाली. कोल्हापूर बिनविरोध करण्यासाठी काँग्रेस आग्रही होते. त्या दिशेने घडामोडी होऊन पावले टाकली जाऊ लागली. नाना पटोले, थोरात यांच्याबरोबरच पालकमंत्री सतेज पाटील यांनीही त्यासाठी पुढाकार घेतला. देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांनीही प्रतिसाद दिला.

गुरुवारी रात्री अकरानंतर हालचालींना वेग आला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी धनंजय महाडिक व प्रा. जयंत पाटील यांना फोन करून माघारीबाबत पुसटशी कल्पना दिली. परंतु, दोघांचेही पालकमंत्री पाटील यांच्याशी थेट वैर असल्याने बोलणार कोण, असा प्रश्न उपस्थित झाला. शेवटी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस यांनी आ. विनय कोरे यांच्याशी चर्चा करून त्यांच्यावर जबाबदारी सोपविली. कोरे यांनी महाडिक व प्रा. पाटील आणि त्यानंतर सतेज पाटील व संजय डी. पाटील यांच्याशी चर्चा केली. अशाप्रकारे भाजपच्या माघारीचा प्रवास सुरू झाला. शुक्रवारी सकाळपासूनच फडणवीस, पटोले, थोरात, चंद्रकांत पाटील, सतेज पाटील, संजय डी. पाटील यांच्यात चर्चेच्या फेर्‍या सुरू झाल्या. धनंजय महाडिक यांच्याशी फडणवीस चर्चा करत होते. अखेर शुक्रवारी साडेअकराला काँग्रेसने धुळेमधून माघार घ्यायची आणि कोल्हापुरातून भाजपने अर्ज मागे घ्यायचा, असा निर्णय झाला.

महाडिकांच्या संमतीनंतर अर्ज मागे ( विधान परिषद निवडणूक )

भाजपचे उमेदवार अमल महाडिक व प्रा. पाटील हे सकाळी आजर्‍याला जात होते. तवंदी घाटात असतानाच चंद्रकांत पाटील व कोरे यांनी अमल महाडिक व प्रा. पाटील यांना कोल्हापूरकडे तातडीने परत येण्याचा निरोप दिला. धनंजय महाडिक यांच्याशी चर्चा करण्यास सांगितले. त्यानुसार महाडिक बंधूंनी चर्चा केली. त्यानंतर फडणवीस हे महादेवराव महाडिक यांच्याशी बोलले. महाडिक यांनी ग्रीन सिग्नल दिल्यानंतर अमल यांनी अर्ज मागे घ्यावा, यावर शिक्कामोर्तब झाले. दोन दिवस त्यासाठी रात्रंदिवस चक्रे फिरत होती. दरम्यान, शुक्रवारी सकाळी सतेज पाटील व संजय डी. पाटील यांनी वारणेत जाऊन सकाळी नऊ वाजता कोरे यांची भेट घेतली. त्यांच्यात बैठक झाली. त्यानंतर संजय डी. पाटील यांच्या तळसंदे येथील कृषी महाविद्यालयात साडेअकराच्या सुमारास पुन्हा बैठक झाली. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पटोले, मंत्री थोरात यांच्याशी भाजपचे फडणवीस, पाटील यांच्याशी अंतिम चर्चा झाली.

मी बिनविरोध… आता अर्ज मागे घ्या…

चंद्रकांत पाटील यांनी धनंजय महाडिक यांना आमचा फोन येत नाही, तोपर्यंत माघार घ्यायची नाही, अशी स्पष्ट सूचना केली. फडणवीस यांनी धुळे-नंदूरबारचे भाजप उमेदवार अमरिश पटेल यांना तुमची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर धनंजय महाडिक यांना फोन करा, त्यानंतरच महाडीक यांनी अर्ज मागे घ्यावा, असे सांगितले. अखेर धुळे-नंदूरबारचे काँग्रेसचे उमेदवार गौरव वाणी यांनी अर्ज मागे घेतल्याने अमरिश पटेल बिनविरोध निवडूण आले. पटेल यांचा महाडिकांना फोन आला, मी बिनविरोध झालो. त्यानंतरच महाडिकांनी अर्ज मागे घेतला.

महाडिकांनंतर सतेज पाटलांची बिनविरोध निवडीची वाटचाल

अटीतटीच्या राजकारणात जिल्ह्यात पुन्हा 18 वर्षांनंतर विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध झाली. 2003-04 साली माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी विधान परिषदेची दुसरी टर्म बिनविरोध करत बाजी मारली होती. यंदाच्या निवडणुकीत मात्र महाडिकांचे कट्टर प्रतिस्पर्धी पालकमंत्री सतेज पाटील यांच्याविरोधात माजी आमदार अमल महाडिक यांनी माघार घेतली. सतेज पाटील यांनीही महाडिक यांच्याप्रमाणेच विधान परिषदेची दुसरी टर्म बिनविरोधात पार केल्याने राजकारणाचे एक चक्र पूर्ण झाल्याची चर्चा आहे.

1995 साली विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर महादेवराव महाडिक यांनी जोरदार कमबॅक करत 1997 साली काँग्रेसच्या अधिकृत विजयसिंह यादव यांचा पराभव केला होता. त्यानंतर महाडिक यांची दुसरी टर्म बिनविरोध झाली. काँग्रेसच्या उमेदवारीवर महाडिक यांनी 2003 ची निवडणूक बिनविरोध जिंकली. त्यानंतर 2009च्या निवडणुकीत त्यांनी प्रा.जयंत पाटील यांचा पराभव केला. त्यानंतर 2014 च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर पाटील यांनी विधान परिषद लढविली. 2015च्या निवडणुकीत सतेज पाटील यांनी काँग्रेसची उमेदवारी खेचून आणली.

बंडखोरी केल्यानंतर महाडिक यांना 63 मतांनी पराभव स्वीकारावा लागला. 2003 ची पुनरावृत्ती होऊन 2021 च्या निवडणुकीत अमल महाडिक यांनी माघार घेतल्याने पाटील यांची बिनविरोध निवड झाली.

Back to top button