आ. शिवेंद्रराजे यांचा आ. शिंदेंवर पलटवार; तुमचा राजेशाही थाट उतरवण्यासाठीच निवडणूक झाली (video) | पुढारी

आ. शिवेंद्रराजे यांचा आ. शिंदेंवर पलटवार; तुमचा राजेशाही थाट उतरवण्यासाठीच निवडणूक झाली (video)

कुडाळ : पुढारी वृत्तसेवा

तुम्ही म्हणता राजे बिनविरोध झाले. मकरंदआबा कुठले राजे आहेत ? राजू राजपुरेचे कोणते राजघराणे ? दत्तानाना काय खंडाळ्याचे राजे आहेत काय ? हे सगळे माझ्याआधी बिनविरोध झाले. आम्ही व रामराजे राजे असूनही मवाळ आहोत म्हणून लोक आमच्यासोबत आहेत. तुम्ही राजे नसतानाही तुमचा राजेशाही थाट असतो. तुमचा हा राजेशाही थाट उतरवण्यासाठीच सर्वसामान्य जावलीकरांनी निवडणूक हातात घेतली, अशा शब्दात सातारा – जावलीचे आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी आ. शशिकांत शिंदे यांच्यावर त्यांच्याच होम पीचवर जाऊन जोरदार पलटवार केला. दरम्यान, शशिकांत शिंदेसाहेब हिशेब चुकते करण्याची भाषा करू नका. यापुढेही आमची दोन हात करण्याची तयारी आहे. तुम्ही आतापर्यंत दहशत माजवली मात्र यापुढे तुम्हाला सातारी हिसका सहन होणार नाही, असे आव्हानच त्यांनी दिले.

आ. शशिकांत शिंदे यांनी पत्रकार परिषदेत आ. शिवेंद्रराजेंवर थेट आरोप करत हल्ला चढवला होता. त्यावर आ. शिवेंद्रराजे यांनी शशिकांत शिंदे यांच्या होम पीचवर जावून एका कार्यक्रमातच पलटवार केला. आ. शिवेंद्रराजे म्हणाले, आम्ही मागच्यावेळी सर्वजण एकत्र होतो म्हणून तुम्ही जिल्हा बँकेत गेला. जिल्हा परिषदेत लढायचे असले तर आम्ही काय करू शकतो हे दाखवून देवू. तुमची नेमकी परिस्थिती काय आहे व या मतदारसंघात तुमची काय अवस्था आहे हे वेळ आल्यावर दाखवू. आ. शिंदे यांनी काही गोष्टी खर्‍या बोलल्या पाहिजेत. ते म्हणतात मी गटबाजी केली नाही पण गटबाजी ही तुमच्या गावापासूनच झाली ही वस्तुस्थिती आहे. त्यांच्या गटबाजीचा उगमच हुमगावात आहे. मयूरचे शिंदे साहेबांनी कमी ऐकले असते तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती, असा टोलाही आ. शिवेंद्रराजेंनी लगावला.

चुकीच्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहचवायच्या, चुकीच्या पध्दतीने राजकारणाबद्दल भरवायचे, वेगळ्या पध्दतीने कार्यकर्त्यांना फोन करायचे? तुमचा पीए असा वागायला लागला तर काय करायच? ज्यांनी 30 ते 40 वर्षांपासून काम केले त्या कार्यकर्त्यांना जर पीए फोन करून सांगत असेल इकडे या, तिकडे जा, हे नियोजन करा, ते नियोजन करा याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. पीएने बसून आमची मापं काढायची. पीएने सांगायचे शिवेंद्रराजे आमदार होतात की नाही हे पाहू. एवढा मोठा तुझा पगार असेल तर मला तुझ्या जागी ठेव आणि तु आमदार हो, अशा शब्दात आ. शिवेंद्रराजे यांनी मयूर देशमुख यांनाही फटकारले.

आ. शिवेंद्रराजे म्हणाले, माजी सभापती शिर्के यांचे पद रद्द व्हावे याची तक्रार कोणी केली? तुमच्याच लोकांनी तक्रार केली ही वस्तुस्थिती आहे. दुसर्‍यांदा जयदीपला मार्केट कमिटीवर का घेतले नाही? फक्त शिवेंद्रराजेंच्या जवळ ते गेल्याने त्यांना मार्केट कमिटीवर नको ही वस्तुस्थिती आहे. पक्षाच्या चौकटीत राहून काम केले तर सौरभ शिंदेचा पराभव कसा झाला? हे सर्वांना माहित आहे. राष्ट्रवादीतील लोकांचा पराभव तुम्हीच केला. आपण थोडे तरी खरे बोलावे. जिल्हा परिषदेला मालोजी अण्णांनी किती वर्ष काढली? मालोजीअण्णा यांच्या विरोधात प्रचार करायची काय गरज होती? अपक्ष असले तरी ते राष्ट्रवादीसोबतच राहिले असते ना? मालोजींंनी एवढं पाप काय केल की त्यांना एवढा टोकाचा विरोध झाला? कार्यकर्ता दाबण्यासाठी धाक धपटशाहीचे राजकारण केले त्याला कार्यकर्त्यांनी विरोध केला. तुमच्या राजकारणामुळे तुमचा पराभव झाला षडयंत्राची भाषा करू नका, असा इशाराही आ. शिवेंद्रराजेंनी दिला.

तुमचे ठराव तुमच्या बाजूने का राहिले नाही याचा विचार करावा. तुमचे लोक तुमच्यासोबत राहिले नाही यात शिवेंद्रराजेंचा काय दोष? हे तुमच्या बगलबच्च्यांनी उद्योग केले त्याचा परिणाम निवडणुकीवर झाला. तो तुम्हाला भोगावा लागला. त्यांच्या पात्रतेनुसार त्यांना ठेवले असते तर हे झाले नसते. त्यामुळे तळपायाची आग मस्तकात गेली नसती याचा विचार करावा. दुसर्‍यावर पराभवाचे खापर फोडायचे हे सोपे असते. आपण कुठे चुकलो याचे आत्मपरिक्षण करणे गरजेचे आहे. एवढा मोठा नेता मी होतो तर मला विचारायचं ना? मला न विचारता कसे काय उभे राहिला? मी एका मतदारसंघाचा आमदार पण मी कार्यसम्राट नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

जिल्हा बँकेत मी शेवटपर्यंत समेट घडवण्याचा प्रयत्न केला. मी उघड उघड विरोधात उतरलो असतो तर रांजणे 30 च्या खाली आले नसते. संघर्ष नको, इतर तालुक्यात वातावरण गढूळ व्हायला नको म्हणून काही केले नाही, असे सांगून आ. शिवेंद्रराजे म्हणाले, तुमचं राजकारणच दमदाटी व धाक धपटशाहीवर चालतं, उस उत्पादकांचं नुकसान शशिकांत शिंदे यांनी केले. अजिंक्यताराला उस घालू नका मी तुम्हाला टोळ्या आणून देतो हे मी नव्हे शिंदे सांगायला आले होते. अभयसिंहराजेंविषयी जाणीव असेल तर तालुक्यातील एखादे तरी भवन दाखवा की त्याला तुम्ही त्यांचे नाव दिले असेल. मग कशाला अभयसिंहराजेंचे गुणगाण सांगता. निवडणुका झाल्या की अभयसिंहराजेंचा फोटो कोठेच नसतो. निवडणुका झाल्या की त्यांच्या आठवणी गुंडाळायच्या व ठेवायच्या ही वस्तुस्थिती आहे, असेही शिवेंद्रराजे म्हणाले.

ऋषीभाईंच्या जागी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता उभा राहिला असता, तुम्ही त्यावेळी का नाव कार्यकर्त्यांच घेतलं नाही. पक्षाच्या कार्यालयावर तुमच्या कार्यकर्त्यांनी दगड मारली. तुम्हाला माहित असल्याशिवाय कार्यकर्ते तोडफोड करू शकत नाही. हा प्रकार होणार आहे हे माहित असूनही त्यांनी दुर्लक्ष केले. सगळ्यांचे हिशोब चुकते करणार असे ते म्हणतात, हिशोब करायची वेळ आल्यास मीही हिशोबाला पक्का आहे हिशोब करायची वेळ आल्यास ताकत व धमक माझ्यात आहे. हिशोबाची भाषा आमच्यासमोर करू नका. मुंबईच्या गुंडांना सातारकरांचा हिशोब परवडायचा नाही, असाही टोला त्यांनी लगावला.

हिशोब करण्यापेक्षा इथं जीवाला जीव देणारी माणसं आहेत, ती जपा. हिशोबाची भाषा करू नका व्याजासकट परत करून नवी सुरूवात जावली तालुक्यात झाली आहे. कोणाचीही तडजोड करून निवडणुका लढवायच्या नाहीत. या तालुक्याच्या सर्व निवडणुका आपल्या ताकतीवर व बळावर आपण लढवायच्या. मंत्री होवून सुध्दा तुमच्या तालुक्यातला छोटा रस्ता देता आला नाही. काय या कार्यसम्राटाचा उपयोग आहे. खांद्यावर हात टाकून दुसर्‍याला डोळा मारायचा हेच तुमच राजकारण असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

या तालुक्यात हस्तक्षेप करायचे बंद करावे. आम्ही तुमच्या मतदारसंघात हस्तक्षेप करायला येत नाही. तुम्ही आमच्या मतदारसंघात हस्तक्षेप करायला येवू नका. तालुका कसा सांभाळायचा, माणस कशी सांभाळयची याची अक्कल आम्हाला आहे. तुम्ही इकडे येवून अक्कल शिकवायची गरज नाही. तालुक्याची काळजी 100 टक्के घेवू शकतो. एवढी धमक व ताकत आमदार म्हणून माझ्यात आहे. कोरेगावला उभा राहण्याचा निर्णय तुम्ही घेतला आहे आम्ही तुम्हाला तिकडे पाठवले नव्हते. आता जिल्हा बँकेला कोरेगावमधील सीट कशी पडली याची जबाबदारी कोणाची? का ती पण माझीच? तुम्ही संचालक जावलीचे अन् बँकेत पोर लावायची कोरेगावची. मी तर सातार्‍यातून निवडून येवून सातार्‍यासह जावलीची मुलं लावली.

आमच्यापेक्षा राजेशाही थाट तुमचा आहे. म्हणूनच तुमची निवडणूक लागली. यासाठीच तुमचा राजेशाही थाट उतरवला पाहिजे, म्हणून जावलीकर एक झाले. तुम्हाला तुमची निवडणुक लढवता आली नाही, तुमची माणसं तुमच्यासोबत राहिली नाही. तुम्हाला लोक सांभाळता आली नाही तुम्हाला लोकांना विश्वास देता आला नाही मग कशाला दुसर्‍यावर खापर फोडतायं? मी एवढा मोठा नेता असतो तर यापूर्वीच पवारसाहेबांनी मला पालकमंत्री केलं असते. जरा आजूबाजूची जी लोक आहेत ते सल्ले बरोबर देतात, चुकीचे देतात, स्वार्थासाठी देतात याचा अभ्यास करावा. असल्यांना ऑफीसमध्ये बसवावे बाहेर पाठवू नये, असा सल्लाही त्यांनी दिला.

  • निवडणुकांपुरते अभयसिंहराजेंचे नाव वापरणे बंद करा
  • सहानुभूती मिळवण्यासाठी दुसर्‍यांवर खापर
  • कोरेगावचा उमेदवार पण मीच पाडला का?
  • जावलीतील ऊस उत्पादकांचे आ. शिंदेंनीच नुकसान केले
  • यापुढे जशास तसे उत्तर देण्याची माझ्यात धमक

Back to top button