एसटी संप : उद्यापर्यंत कामावर या, अन्यथा पगारवाढीबाबत विचार; परबांचा गर्भित इशारा | पुढारी

एसटी संप : उद्यापर्यंत कामावर या, अन्यथा पगारवाढीबाबत विचार; परबांचा गर्भित इशारा

मुंबई; पुढारी ऑनलाईन

एसटी कर्मचाऱ्यांना मूळ पगारात वाढ दिली आहे, त्यामुळे कामगारांनी एसटी संप मागे घ्यावा. सरकारने पगारवाढ देऊनही कामगार कामावर येणार नसतील तर पगारवाढीबाबत सरकार विचार करेल, असा गर्भित इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला.

परब यांनी आज एसटी कृती समितीसोबत बैठक घेतली. या बैठकीची माहिती त्यांनी पत्रकारांना दिली.

परब म्हणाले, ‘ एसटी कर्मचाऱ्यांना सरकारने मूळ पगारात मोठी पगारवाढ दिली आहे. सध्या एसटीचा संप मागे घ्यावा एवढचं सरकारने कर्मचाऱ्यांना सांगितले आहे. तरीही काहीजण राजकीय पोळी भाजून घेत आहेत. काही कर्मचारी कामावर येण्याच्या मानसिकतेत आहेत.

त्या कामगारांनी आज विचार करून उद्यापर्यंत कामावर हजर राहिले पाहिजे, अन्यथा आम्ही कारवाईचा बडगा उगारणार आहोत. कामगारांचे म्हणणे ऐकायला तयार आहोत. पगारवाढ देऊनही संप सुरू ठेवला तर आम्ही पगारवाढीवर विचार करू.

जे रोजंदारी कर्मचारी आवाहन करूनही कामावर आले नाहीत त्यांच सेवा समाप्त केली आहे. कर्मचारी ग्रेडमधील फरकाबाबत चर्चा करत आहेत. त्यांना आम्ही सांगू इच्छितो की कामावर या, त्यानंतरच याबाबत चर्चा करू, कामगारांच्या गैरसमजांबाबतही चर्चा करू.

एसटी बंद ठेवणे कुणालाही परवडणारे नाही. एसटी बंद ठेवणे सरकार आणि प्रवाशांसह कामगारांना परवडणारे नाही. राजकीय पक्षांनी पोळी भाजावी, पण करपणार नाही याची काळजी घ्यावी. आत्तापर्यंत १५० नवीन कर्मचारी कामावर घेतले आहेत.’

राज्य सरकारकडून वेतनवाढीचा प्रस्ताव दिल्यानंतर राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेऊन आवाहन केले होते. पण एसटी कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम असून त्यांनी संप सुरुच ठेवण्याचा निर्णय घेतलाय. जोपर्यंत विलिनीकरण होत नाही तोपर्यंत एसटी कर्मचारी काम करणार नाहीत, असे ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी जाहीर केले आहे.

दरम्यान, ॲड. सदावर्ते यांनी, एसटी संपाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मंत्री अनिल परब यांच्यावर जोरदार टीका केली. कष्टकऱ्यांना तोडण्याच्या परीक्षेत काल तुम्ही नापास झाला. शरद पवार, अनिल परब यांनी आंदोलन तोडण्याचा प्रयत्न केला, असा आरोप त्यांनी केला.

शरद पवार यांनी गेल्या दोन दिवसांपासून कष्टकऱ्यांना तोडण्यासाठी प्रयत्न केला. माणसं पळवून नेण्याचा प्रयत्न केला. पण कष्टकरी तुटला नाही. विलिनीकरणाचा लढा सुरुच राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. २५० डेपोंशी चर्चा झाली. २५० डेपोंमधील काम बंद असल्याची माहिती ॲड. सदावर्ते यांनी दिली. यावेळी ॲड. सदावर्ते यांनी राजकीय नेत्यांचा एकेरी उल्लेख केला.

खोत, पडळकरांची आंदोलनातून माघार…

दरम्यान, सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी आझाद आंदोलनातून माघार घेतली आहे. तशी त्यांनी घोषणा केली.

हेही वाचा : 

Back to top button