ठाणे : ४५ फुटांची संरक्षण भिंत तीन गाड्यांवर कोसळली
ठाणे; पुढारी वृत्तसेवा : इमारतीच्या कंपाऊडची ४० ते ४५ फुटांची संरक्षण भिंत आणि एक झाड परिसरात उभ्या केलेल्या तीन गाड्यांवर पडली. ही घटना सोमवारच्या मध्यरात्री वागळे इस्टेट येथे घडली.
यामध्ये कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
वागळे इस्टेट, जुन्या पासपोर्ट ऑफिस जवळील अँफोटेक पार्कची सुमारे ४० ते ४४ फुटांची संरक्षण भिंत आणि १ झाड सोमवारी मध्यरात्री १.३० वाजण्याच्या सुमारास भिंतीलगत उभ्या केलेल्या तीन आलिशान चारचाकी वाहनांवर पडले.
या घटनेची माहिती मिळताच ठाणे महानगरपालिका, आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेतली. यानंतर चारचाकी गाड्यांवर पडलेले झाड कर्मचाऱ्याच्या मदतीने कापून बाजूला केले.
रात्रीची वेळ आणि पाऊस सुरूच असल्याने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याचा माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
२४ तासात ३७.३० मिमी पाऊस
गेल्या चोवीस तासात ठाणे शहरात ३७.३० मिमी पावसाची नोंद झाली आहे. तसेच मंगळवारी सकाळपासून पाऊस पडत असल्याने दुपारपर्यंत सूर्यनारायणाचे दर्शन दुर्लभ झाले होते. तर आतापर्यंत शहरात १३०९.२६ मिमी नोंद झाली असून गतवर्षी याचदरम्यान १०९५.४४ मिमी पाऊस झाल्याची माहिती आपत्ती कक्षाने दिली
हेही वाचा
पाहा :कोरोना संदर्भात जागरूकता निर्माण करण्याचे काम करतोय जोकर !

