Nashik Malegaon | उत्साह अन् शांततापूर्ण उत्सवांची परंपरा जपा : मंत्री दादा भुसे | पुढारी

Nashik Malegaon | उत्साह अन् शांततापूर्ण उत्सवांची परंपरा जपा : मंत्री दादा भुसे

मालेगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

गणेशोत्सव व ईद ए मिलाद हे सण एकाच दिवशी येत आहेत. त्याअनुषंगाने शहराची शांतता व एकात्मता टिकून राहण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. कायदा व सुव्यवस्थेचे काटेकोरपणे पालन करुन सण उत्सव साजरे करावेत, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी केले.

शुक्रवारी पोलिस नियंत्रण कक्षातील सुसंवाद हॉलमध्ये झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. शहरात सर्व सण शांतता व उत्साहात साजरे करण्याची पूर्वीपासून परंपरा असल्याचा मला अभिमान आहे. त्याचप्रमाणे प्रशासनाने समन्वय ठेवून काटेकोरपणे नियोजन करावे, अशा सूचना यावेळी भुसे यांनी यावेळी दिल्या. वीजविषयक समस्या सोडविण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचेही त्यांनी सुचविले.

गणेशोत्सव व ईद ए मिलाद सणानिमित्त निघणाऱ्या मिरवणुकीच्या वेळी काही अनुचित प्रकार घडू नये तसेच नागरिकांना कोणत्याही समस्या उद्भवणार नाही यादृष्टीने वाहतुकीचे सुयोग्य नियोजन करावे. महानगरपालिकेने रस्त्यांची सुरु असलेली कामे गुणवत्तापूर्ण पद्धतीने तत्काळ पूर्ण करावीत. तसेच रस्त्यावर हातगाडी व इतर कारणांमुळे वाहतूक ठप्प होते, वाहतुक करण्यास अडचण निर्माण होते. अशा वेळी हातगाडीवाल्यांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन भुसे यांनी केले.

बैठकीत विविध मंडळांनी मांडलेल्या समस्या काही अंशी संबंधित प्रशासनाच्या माध्यमातून सोडविण्यात आल्या आहेत, उर्वरितही सोडविण्याचे आश्वासन त्यांनी दिले. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी ,सणानिमित्त जाहिरात फलके लावताना संबंधित प्रशासनाची परवानगी घ्यावी, असे सांगितले.

पोलीस अधिक्षक शहाजी उमाप म्हणाले की, गणेशोत्सव व ईद ए मिलाद सणानिमित्त निघणारी मिरवणूक प्रत्येक मंडळाने शिस्तबध्द पध्दतीने काढून त्यात कोणालाही इजा होणार नाही, तसेच होणाऱ्या अनुचित घटना टाळण्यासाठी सावधानता बाळगून खबरादारी घेण्याच्या सूचना केल्या. तसेच मिरवणुकीतील प्रत्येक वाहनाने परिवहन विभागाकडे नियमानुसार तपासणी करुन घ्यावी. तसेच डीजेचा आवाज नियमानुसार ठेवून सणांचा मनसोक्तपणे आनंद घेवून उत्साहात साजरा करावा. शासनाकडून गणेशोत्सव मंडळासाठी बक्षिसे ठेवली जातात परंतु मंडळाकडून पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाही. त्याचप्रमाणे पोलीस विभागाकडून गणेश मंडळांसाठी बक्षिस योजना ठेवण्याचे प्रयोजन असून मंडळांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. महानगरपालिका आयुक्त भालचंद्र गोसावी व अपर पोलीस अधिक्षक अनिकेत भारती यांनी आपापल्या विभागाकडून सणानिमित्त केलेल्या नियोजनाची व उपयोजनांची माहिती यावेळी दिली.

हेही वाचा :

Back to top button