राज्यात इंधन दरवाढीने महागाईचा भडका! | पुढारी

राज्यात इंधन दरवाढीने महागाईचा भडका!

मुंबई ; चेतन ननावरे : गेल्या वर्षभरात इंधन दरवाढीच्या भडक्याने सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आले आहेत. मुंबईत एका वर्षात पेट्रोल व डिझेलच्या दरात प्रति लीटर 40 टक्क्यांनी भडका उडाला आहे.

त्यामुळे मालवाहतूकदारांनी वाहतूक दरांत तब्बल 15 टक्क्यांनी वाढ केली आहे. याउलट एलपीजी दरात 44 टक्क्यांनी वाढ झाल्याने सर्वसामान्य गृहिणींचे महिन्याचे बजेट पुरते कोलमडले आहे.

राज्यात गतवर्षी मे महिन्यात घरगुती वापराच्या 14.2 किलोग्रॅम वजनाच्या एलपीजी सिलिंडरसाठी नागरिकांना 579 रुपये मोजावे लागत होते. याउलट जुलै 2021 पर्यंत त्यात 834.50 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे.

अर्थात एका सिलिंडरमागे 255 रुपये अधिक खर्चावे लागणार आहेत. शासनाने अनुदान बंद केल्यामुळे सर्वसामान्यांना या सिलिंडरच्या किमतीचे पूर्ण पैसे भरावे लागणार आहेत.

लॉकडाऊनमुळे हाताला काम नसताना आणि पगार कपात सुरू असताना घरगुती वापराच्या एलपीजी गॅसमधील वाढ म्हणजे जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याची प्रतिक्रिया गृहिणी विशाखा सचिन फापाळे यांनी दिली.

पेट्रोल दरवाढीने तर उच्चांक गाठला आहे. गेल्यावर्षी मे महिन्यात मुंबईत पेट्रोलचे दर प्रति लीटर 76.31 रुपये होते. त्यात यावर्षी जुलैमध्ये 106.59 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे.

एका वर्षात पेट्रोलच्या दरात तब्बल 40 टक्क्यांनी वाढ झाल्याने सर्वसामान्य वाहन चालकांचे कंबरडे मोडले आहे. पेट्रोल दराने शंभरी ओलांडल्यामुळे इलेक्ट्रिक दुचाकी घेतल्याचे वाहन चालक रुपेश वर्पे यांनी सांगितले.

डिझेल दरवाढीमुळे वाहतूक खर्च महागल्याची माहिती वाहतूकदारांच्या बॉम्बे गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनने दिली. संघटनेने सांगितले की, लॉकडाऊन आणि निर्बंधांमुळे माल वाहतूक वाहने पार्किंगमध्ये उभी आहेत.

त्यात वाढत्या डिझेलच्या किंमतीमुळे वाहतूक खर्च वाढवण्याशिवाय दुसरा पर्याय वाहतूकदारांसमोर नाही. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी माल वाहतूक 15 टक्क्यांनी महागली आहे.

मात्र दिवसागणिक वाढणार्‍या दरांमुळे ही दरवाढ 40 टक्क्यांपर्यंत वाढेल, अशी भीती संघटनेने व्यक्त केली आहे.

खाद्यतेल दरवाढीचा भडका

गेल्या वर्षी मे महिन्यात मोहरीच्या तेलाचे दर किलोला 118.25 रुपये होते. यावर्षीच्या मेमध्ये 39% वाढ होऊन ते 164.44 रुपये किलोवर पोहोचले.

गतवर्षी मेमध्ये पाम तेलाचे दर 88.27 रुपये किलो होते. यावर्षीच्या मेमध्ये ते 131.69 रुपये प्रतिकिलो झाले. गेल्या 11 वर्षांतील हा उच्चांक आहे.

शेंगदाणे तेलाचे दर 175.55 रुपये, वनस्पती तेल 128.70 रुपये, सोयाबीन तेल 148.27 रुपये, सूर्यफूल तेल 169.54 रुपये प्रतिकिलोपर्यंत वाढले आहेत.

Back to top button