जालना : बदनापुर खून प्रकरणातील आरोपी २४ तासात जेरबंद | पुढारी

जालना : बदनापुर खून प्रकरणातील आरोपी २४ तासात जेरबंद

जालना; पुढारी वृत्तसेवा : बदनापूरनजीकच्या जालना-औरंगाबाद महामार्गावरील देवगाव फाटयाजवळ सोमवारी (दि.१३) एका तरुणाला अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्राने भोसकून खून केल्याची घटना घडली होती. शेख फय्याज शेख रईस (वय २५ वर्ष रा. शेर सवार नगर, जालना) या तरुणाचा खून झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. तय्यब अकबर शेख असे आरोपी तरुणाचे नाव असल्याची माहिती पोलिसात तपासात समोर आली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांचे गुन्हा उघडकीस आणण्यासाठी वेगवेगळे पथक तयार केले होते. मयताची ओळख पटविण्यासाठी जालना तसेच औरंगाबाद जिल्ह्यात भेट देऊन तेथील मिसिंग व्यक्तीची माहीती घेतली. तसेच वेगवेगळ्या समाज माध्यमातुन मयताची ओळख पटविण्याबाबत अहवान केले. त्यानंतर मयत तरुणाची ओळख पटली. हा तरुण शेरसवारनगर जुना जालना येथील असुन त्याचे नाव शेख फय्याज शेख रईस (वय 25 वर्ष) असे आहे.

स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळांचा अभ्यास करुन मयत या ठिकाणी कसा आला असेल, मयताचे कोणासोबत वाद आहेत काय, मयतास त्याचे नातेवाईक व मित्रांनी शेवटी कधी पाहीले होते याचा मागोवा पोलिसांनी घेतला. या तपासानंतर तय्यब अकबर शेख (वय २३ वर्ष रा. शेरसवार नगर, जुना जालना) असे आरोपीचे नाव असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी सापळा रचुन त्याला विश्वासात घेऊन विचारपुस केली असता त्याने शेख फय्याज याचा खुन केल्याचे कबुल केले. बदनापुर पोलीस ठाणे या घटनेचा अधिक तपास करित आहे.

पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग जालनाचे निरज राजगुरु, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग यांच्यासह अन्य पोलीस कर्मचाऱ्यांचा या तपासात समावेश आहे.

Back to top button