औरंगाबादकरांना ‘९’ क्रमांकाची भूरळ; पसंती क्रमांकासाठी मोजले ६ कोटी ५२ लाख रुपये | पुढारी

औरंगाबादकरांना '९' क्रमांकाची भूरळ; पसंती क्रमांकासाठी मोजले ६ कोटी ५२ लाख रुपये

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : हौसेला मोल नसते असे म्हणतात. अगदी तसेच औरंगाबादकरांचे झाले आहे. आपल्या पसंतीचा क्रमांक किंवा पूर्ण क्रमांकांची बेरीज आपल्या पसंतीक्रमांकाची आली पाहिजे. यासाठी वाट्टेल ती किंमत मोजण्यास काहीजण तयार असतात. ही बाब नुकतीच समोर आली आहे. २०२१ ते १० डिसेंबर २०२२ या एक वर्ष ११ महिन्यांच्या काळात चारचाकी किंवा दुचाकीच्या पसंती क्रमांकासाठी तब्बल ६ कोटी ५२ लाख ३४ हजार ५०० रुपये मोजले आहेत, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे यांनी दिली.

अनेक वाहनधारक नवीन वाहनांना पसंती क्रमांक मिळावा यासाठी धडपडतात. यात औरंगाबादकर अग्रेसर आहेत. त्यांनी १ वर्ष ११ महिन्यांच्या कालावधीत तब्बल  ७ हजार १६० वाहनधारकांनी पसंती क्रमांकासाठी ६ कोटी ५२ लाख ३४ हजार ५०० रुपये मोजले असल्याची माहिती आरटीओ कार्यालयाच्या वतीने देण्यात आली. २०२१ मध्ये पसंती क्रमांकाच्या माध्यमातून येथील आरटीओ कार्यालयाला सुमारे ३ कोटी ९३ लाख ८४ हजार ५०० रुपये व उर्वरीत महसूल २०२२ मधील ११ महिन्यांत मिळाला.

९ क्रमांकाची भुरळ

दरम्यान वाहनधारक आपला लकी किंवा आवडीचा क्रमांक म्हणून ९ नंबरची मागणी मोठ्या प्रमाणात करत असल्याचे एकंदरीत आकडेवारीवरून दिसून येत आहे. सिंगल ९ किंवा ज्या अंकाची बेरीज 9 येते त्या क्रमांकाची मागणी मोठ्या प्रमाणात होती. यातून सुमारे १ ते २ कोटींचा महसूल प्राप्त झाल्याची माहिती समोर आली आहे. पसंती क्रमांकाचे दर तीन हजार ते अडीच लाखापर्यंत आहेत. एकाच क्रमांकांची अनेकांकडून मागणी होत असल्यास त्यांची हर्रासी करावी लागते. यातूनही मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त झाला असल्याची माहिती काठोळे यांनी दिली.

हेही वाचंलत का?

Back to top button