औरंगाबादेत रोबोटच्या हस्‍ते गणरायाची आरती अन् प्रसादाचेही वाटप | पुढारी

औरंगाबादेत रोबोटच्या हस्‍ते गणरायाची आरती अन् प्रसादाचेही वाटप

औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवा अवघ्या महाराष्ट्रात भक्तीभावाने आणि जल्लोषाच्या वातावरणात गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. औरंगाबादमध्ये गणेशोत्सव साजरा करताना अध्यात्माला टेक्नॉलॉजीची जोड देण्यात आली. वाळूज एमआयडीसीमधील मेटलमॅन ॲटो प्रा.लि. कंपनीमध्ये चक्क रोबोटच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात येत आहे.

हा रोबोट सर्वांच्या आकर्षणाचा केंद्र बनला असून,सकाळी आणि संध्याकाळी कंपनीमध्ये रोबोटच्या हस्ते आरती करण्यात येते. इतकेच काय आरतीला उपस्थित असलेल्या प्रत्येक गणेशभक्ताला रोबोट प्रसादाचेही वाटप करतो. मेटलमॅन ॲटो या कंपनीच्या वाळूज येथील बी १२ या प्लांटमध्ये शंभरावर रोबोटच्या माध्यमातून काम करण्यात येते.

गेल्या २० वर्षांपासून उद्योग क्षेत्रामध्ये काम करत असलेल्या या कंपनीमध्ये दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. कंपनीमध्ये प्रामुख्याने रोबोटकडून वेल्डिंग, चेकिंग, इन्स्पेक्शन आदी काम करवून घेण्यात येतात, ज्या ठिकाणी बारा महिने चोवीस तास रोबोटसोबत काम करतो, त्याच रोबोटच्या हस्ते यंदा गणरायाची आरती करण्याची कल्पना कामगारांनी सीईओ श्रीकांत मुंदडा यांच्यासमोर मांडली आणि त्यांनी तत्काळ यास मंजूरी दिली. यानंतर कामगारांनी रोबोट तयार करुन त्यामध्ये आरती करण्याचा तसेच प्रसाद वाटण्याचा प्रोग्राम सेट केला. आता गणेशोत्सव काळात दररोज सकाळी आणि संध्याकाळी गणरायाची आरती रोबोटच्या माध्यमातून करण्यात येते.

या विषयी बोलताना प्रोडक्शन हेड तसेच सीएसआर विभागाचे प्रमुख अवधुत शिंदे म्हणाले की, रोबोटचा आणि आमचा जिव्हाळ्याचा संबंध आहे, याच रोबोटचा उपयोग महाराष्ट्राचा सर्वात मोठा उत्सव असलेल्या गणेशोत्सवात करावा असे आम्हाला वाटले, वरिष्टांकडून परवानगी मिळताच सर्वजण कामाला लागलो आणि रोबोट तयार झाला. या माध्यमातून आम्ही अध्यात्माला टेक्नॉलॉजीची जोड देण्याचा संदेश पोचवण्याचा प्रयत्न केला असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

रोबोटमध्ये आरती ओवळण्याचा प्रोग्राम सेट 

रोबोट तयार करताना आरती ओवळणे तसेच प्रसाद वाटप करण्याचा प्रोग्राम सेट करण्यात आला आहे. आरती सुरु करताच रोबोट गणरायाला आरती ओवाळण्यास सुरुवात करतो. आरती संपल्यानंतर प्रत्येक कर्मचाऱ्यासमोर प्रसादाचे तबक घेऊन रोबोट जातो आणि कर्मचारी प्रसाद घेतात. गणेशोत्सव कालावधीत दररोज सकाळी आणि संध्याकाळी रोबोटच्या हस्ते ही आरती करण्यात येते.

हेही वाचा :  

Back to top button