सोलापूर : नळ नसलेल्या मिळकतदारांना नोटिसा | पुढारी

सोलापूर : नळ नसलेल्या मिळकतदारांना नोटिसा

सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा शहरातील सुमारे 60 हजार मिळकतींमध्ये नळ कनेक्शन नाही. अशा मिळकतदारांना स्वत:चे नळ घेण्याबाबत लवकरच विभागीय कार्यालयांकडून नोटिसा बजाविण्यात येणार आहे, अशी माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली. वॉटर ऑडिटमध्ये शहरात 60 हजार मिळकतींमध्ये नळ नसल्याचे आढळून आले आहे. असे मिळकतदार शेजार्‍यांकडून पाणी घेतात. मनपाच्या नवीन धोरणानुसार नळ नसलेल्या मिळकतदारांनी स्वत:चे नळ घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. यानुसार अशा मिळकतदारांना मनपाकडून नोटिसा देण्यात येणार आहे. जे मिळकतदार शेजार्‍यांना पाणी विकत असतील तर अशांना दुप्पट पाणीपट्टी आकारण्यात येणार आहे.

शहरात मनपाचे एकूण तीन ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया केंद्रे (एसटीपी) आहेत. येथे पाण्यावर प्रक्रिया करुन ते नाल्यात सोडले जाते. इचलकरंजी व चिंचोळी एमआयडीसीत प्रक्रिया केलेल्या पाण्याचा प्रायोगिक तत्त्वावर पुनर्वापर सुरु आहे. यानुसार तीन एसटीपीच्या पाण्याचा पुनर्वापर करण्याबाबत औद्योगिक संघटनांना प्रस्ताव देण्यात आला आहे.

प्रक्रिया केेलेले पाणी एनटीपीसीलादेखील देण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र, या पाण्यात सल्फाईडचे प्रमाण जास्त असल्याने हे पाणी उद्योगासाठी वापरता येत नाही असे एनटीपीसी तसेच औद्योगिक संघटनांचे म्हणणे आहे. भविष्यात या पाण्यामध्ये आणखीन सुधारणा करुन ते उद्योगाला वापरासाठी देणे शक्य असेल तर तशी योजना मनपाकडून राबविली जाणार आहे, असे मनपा आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी सांगितले.

गुंठेवारीत मोजणीशिवाय बांधकाम परवाना नाहीच

गुंठेवारीमधील बांधकाम परवाना देण्याचे काम अजूनही सुरू झाले नाही याबाबत विचारले आयुक्तांनी सांगितले की, गुंठेवारी क्षेत्रातील लेआऊट हे गटाच्या हद्दीबाहेर असल्याचे प्रकार निदर्शनास आले आहेत. त्यामुळे मोजणी व मोजणी नकाशा दिल्याशिवाय बांधकाम परवाना देण्यात येणार नाही.

Back to top button