पंढरपूर : वारकर्‍यांच्या सोयीसुविधांसाठी जिल्ह्याला 2.5 कोटी : ना. मुश्रीफ | पुढारी

पंढरपूर : वारकर्‍यांच्या सोयीसुविधांसाठी जिल्ह्याला 2.5 कोटी : ना. मुश्रीफ

पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा पंढरपूरची आषाढी वारी ‘निर्मलवारी’ होण्यासाठी पंढरीला जाणार्‍या पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींना 2 कोटी 59 लाख 75 हजार रु. निधी दिला असल्याची माहिती ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे झालेल्या बैठकीत आषाढी एकादशीनिमित्त पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींना अनुदान देण्याबाबत मागणी करण्यात आली होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे, असे मुश्रीफ यांनी सांगितले.

आषाढी एकादशीच्या निमित्त पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यांतून विविध संतांच्या पालख्या सोबत मार्गक्रमण करणार्‍या वारकर्‍यांना सोयीसुविधा पुरविण्यासाठी पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींना अनुदान देण्यात येते. यानुसार पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांतील विविध ग्रामपंचायतींना अनुदान देण्यासाठी 2 कोटी 59 लाख 75 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे, असे मुश्रीफ यांनी सांगितले.

पुणे, सातारा व सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मागणी केलेल्या निधीच्या 50 टक्के निधी राज्य शासनाने उपलब्ध करून दिला आहे. उर्वरित निधी जिल्हा परिषदांनी त्यांच्या स्वनिधीतून अथवा अन्य निधीतून उपलब्ध करावयाचा आहे. हा निधी जिल्हा परिषदांनी ग्रामपंचायतींना मागणीनुसार उपलब्ध करून द्यायचा आहे, असे मुश्रीफ यांनी सांगितले.

पुणे, सातारा व सोलापूर जिल्ह्यातून मार्गक्रमण करणार्‍या विविध संतांच्या पालख्या सोबत असणार्‍या भाविकांना स्वच्छता पुरविण्यासाठी भाडेतत्त्वावर तात्पुरत्या शौचालयाची व्यवस्था करण्यासाठी 6 कोटी 73 लाख वीस हजार रुपयांचा निधी पुणे जिल्हा परिषदेला उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली आहे. एकूण मंजुरीच्या 20 टक्के प्रमाणात म्हणजेच 1 कोटी 34 लाख 64 हजार रुपयांचा निधी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना बीडीएस प्रणालीद्वारे वितरित करण्यात आला असल्याची माहितीही मुश्रीफ यांनी दिली.

असा मिळणार निधी

  • सोलापूर जिल्हा परिषदेला 1 कोटी 57 लाख 50 हजार
  • पुणे जिल्हा परिषदेला 82 लाख
  • सातारा जिल्हा परिषदेला 20 लाख 25 हजार

Back to top button