पाऊसाविना खरीप पेरण्यांचा खोळंबा | पुढारी

पाऊसाविना खरीप पेरण्यांचा खोळंबा

हंजगी : पुढारी वृत्तसेवा : अर्धा जूनचा महिना संपत आला तरी अद्याप पेरणीयोग्य पाऊस झाला नाही, त्यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. हवामान खात्याने अंदाजानुसार शेतकरी पेरणीसाठी सज्ज झाला. मात्र, पावसात अद्याप पत्ता नाही, त्यामुळे अक्कलकोट तालुक्यातील खरिपच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. तालुक्यातील शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. शेतकर्‍यांच्या नजरा आकाशाकडे लागून आहेत. अक्कलकोट तालुक्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र 1 लाख 41 हजार 880 हेक्टर आहे, त्यापैकी पेरणी लायक लागवडी योग्य 1 लाख 31 हजार 604 हेक्टर क्षेत्र आहे. आणि सध्या खरीप पिकाखाली 65 हजार 225 हेक्टर क्षेत्र योग्य आहे. खरीप मध्ये प्रामुख्याने तूर, सोयाबीन, मूग, उडीद, मका बाजरी, सूर्यफूल आदी पिके घेतली जातात. परंतु, सध्या तालुक्यात दमदार पाऊस पडत नसल्याने खरीप पेरण्या खोळंबल्या आहेत.

यंदा हवामान अंदाजानुसार शेतकरी खरिपाची तयारी करुन बसले आहेत. तर बागायत शेतकर्‍यांना पाणी कमी पडत असल्याने ऊस, फळबाग आदी बागायत पीक मात्र वाळून चालले आहे. सध्या जमिनीत उष्णता असल्याकारणाने पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणी करता येणार नाही. अशा कमी पावसावर पेरणी केल्यास उगवण क्षमता कमी होते. मग दुबार पेरणीचे संकट येऊ शकते. त्यामुळे पुरेशी ओलं झाल्याशिवाय पेरणी न करण्याचे आवाहन तालुका कृषि कार्यालयाकडून केली जात आहे.

परंतु, इकडे पेरणीला उशीरा होत असल्याने शेतकरी मात्र हवालदिल झाला आहे. एकीकडे तालुका कृषी कार्यालयाकडून शेतकर्‍यांना पेरणीसाठी मार्गदर्शन करतात. यंदा हवामान अंदाजानुसार तालुक्यात पाऊस चांगला होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत होता. परंतु, अद्याप पावसास सुरुवात झाला नाही, त्यामुळे अंदाज चुकीचा ठरत असल्याचे दिसत आहे. तालुक्यात सतत दोन वर्षे वरुणराजा मनसोक्त बरसल्याने तालुक्यातील नदी, नाले, ओढे व तलाव ओव्हर फ्लो झाले होते. यंदा मात्र तालुक्यात फक्त वादळी वारे व उष्णतेची लाट पहायला मिळत आहे, यामुळे तालुक्यातील बळीराजा सध्या धास्तवला आहे.दररोज तालुक्यातील शेतकरी आकाशाकडे नजरा लावून वरुणराजाची प्रतिक्षा करताना दिसतात. परंतु, तालुक्यात वरुणराजाचे दर्शन मात्र होताना दिसुन येईना.

आकाशात फक्त ढगाळ वातावरण पहायला मिळत आहे. परंतु, तालुक्यात दमदार पाऊस पडताना दिसेना.तालुक्यात तडवळ व वसंतराव नाईक नगर भागात मात्र मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्याने या भागात काही प्रमाणात खरीप पेरण्या होताना दिसून येत आहेत. तालुक्यातील बराच भाग कोरडा ठाक पडला आहे. तालुक्यात अजूनही बहुसंख्य भागात पावसाचे प्रमाण अतिशय कमी झाल्याने या भागातील शेतकरी चिंतातूर झाले आहेत.

शेतकर्‍यांनी पेरणीसाठी घाई करू नये. कारण सध्या जमिनीत उष्णता असल्याकारणाने पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, अशा कमी पावसात पेरणी केल्यास उगवण क्षमता कमी होईल.
– रामचंद्र माळी, प्रभारी तालुका कृषी अधिकारी, अक्कलकोट.

यंदा वसंतराव नाईक नगर परिसरात मान्सूनपूर्व पाऊस झाल्याने सध्या या भागात खरीप पेरणी सुरू आहे. गत वर्षाप्रमाणेच यंदाही आमच्या भागात वेळेवर पाऊस झाल्याने वेळेवर पेरणी होत आहे.
– सचिन जाधव, शेतकरी, वसंतराव नाईकनगर तांडा.

Back to top button