सोलापूर : शहरात अतिक्रमणाबाबत दोन स्वतंत्र कारवाया | पुढारी

सोलापूर : शहरात अतिक्रमणाबाबत दोन स्वतंत्र कारवाया

सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा शहरात गत अनेक दिवसांपासून सुरू असलेली अतिक्रमणविरोधातील मोहीम सुरूच आहे. शनिवारी रेल्वे तसेच महापालिकेने रेल्वे स्टेशन परिसरात दोन स्वतंत्र कारवाया केल्या. रेल्वे स्टेशन ते महापौर बंगला या रस्त्यावर रेल्वेच्या जागेवर अतिक्रमण करुन बांधलेली इमारत तसेच अन्य अतिक्रमणे रेल्वे विभागाने शनिवारी जेसीबीच्या साहाय्याने पोलिस बंदोबस्तात जमीनदोस्त केली. तत्पूर्वी या कारवाईमुळे रहदारीला अडथळा होऊ नये, म्हणून रेल्वे स्टेशन ते महापौर निवासपर्यंतचा रस्ता बॅरिकेडस् करून रहदारीला बंद करण्यात आला. या मार्गावरील वाहतूक अन्यत्र वळविण्यात आली.

अतिक्रमण विभाग आणि शहर वाहतूक शाखेने रेल्वे स्टेशन परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेण्यात आली होती.
दोनच दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज चौकातीलही अतिक्रमण काढण्यात आले होते. आता आज रेल्वे स्टेशन परिसरात ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे अतिक्रमणविरोधी पथक येताच व्यावसायिकांची चांगलीच धावपळ पाहायला मिळाली हे अतिक्रमण काढण्यासाठी शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलिस आयुक्त शवाशा अजय परमार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वनाथ सिद, धनाजी शिंगाडे व त्यांचे पथकाचा बंदोबस्ताचा मोठा फौजफाटा तैनात होता. दरम्यान, पोलिस उपायुक्त डॉ. दिपाली घाटे यांनी कारवाईस्थळी अचानक भेट दिली.

मनपाकडून पाडापाडी नाही

रेल्वे विभागाने जेसीबीने अतिक्रमणांचा सफाया केला, मात्र महापालिका व शहर वाहतूक शाखेच्या संयुक्त कारवाईत केवळ दुकानदारांचे साहित्यच जप्त करण्यात आले. 16 गाळ्यांचे काऊंटर तसेच दहा हातगाड्या जप्त करण्यात आल्या. रेल्वे स्टेशनसमोरील सिकची धर्मशाळा व पोस्ट ऑफिससमोर ही कारवाई करण्यात आली.

दुकानदारांना दोन दिवसांची मुदत

धर्मशाळेच्या गाळेधारकांनी गाळ्याच्या मूळ क्षेत्रफळापेक्षा पाच-सहा फूट पुढे येऊन शटर थाटले आहे. हे अतिक्रमण आज मनपाकडून पाडण्यात आले नाही, मात्र केवळ साहित्य जप्तीची कारवाई करण्यात आली. शटर व अन्य अतिक्रमण स्वत:हून काढण्यासाठी मनपाने दुकानदारांना दोन दिवसांची मुदत दिली आहे. जर मुदतीत दुकानदारांनी अतिक्रमण न हटविल्यास मनपाकडून ते पाडले जाणार आहे. दरम्यान, सिकची धर्मशाळेच्या गाळ्यांच्या क्षेत्रफळाची मोजणी मनपाच्या भूमी व मालमत्ता विभागाकडून होणार आहे, अशी माहिती मनपाचे अतिक्रमण प्रतिबंधक अधिकारी अरुण सोनटक्के यांनी दिली.

Back to top button