सोलापूर : काँग्रेस कार्यकर्त्यांचा जिल्हास्तरीय संवाद मेळावा घेणार | पुढारी

सोलापूर : काँग्रेस कार्यकर्त्यांचा जिल्हास्तरीय संवाद मेळावा घेणार

सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा आगामी स्थानिक स्वराज्य निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना अधिक बळकट होणे आवश्यक आहे. यासाठी कार्यकर्त्यांचा जिल्हास्तरीय प्रशिक्षण व संवाद मेळावा लवकरच आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष डॉ.धवलसिंह मोहिते पाटील यांनी दिली.

काँग्रेसभवनात गुरुवारी दुपारी काँग्रेस पदाधिकार्‍यांची बैठक घेण्यात आली. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार निर्मलाताई ठोकळ, माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, विजयकुमार हत्तुरे, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती श्रीशैल नरोळे, जिल्हा उपाध्यक्ष सुधीर लांंडे, जिल्हा सरचिटणीस भीमराव बाळगी, अशपाक बळोरगी, रमेश हसापूरे, अशोक देवकते आदी पदाधिकारी उपस्थित होते. प्रारंभी पदाधिकार्‍यांनी मनोगत व्यक्त करून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिक सक्रिय होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त कले.

यावेळी मोहिते पाटील म्हणाले, काही दिवसापुर्वीच उदयपूर येथे राष्ट्रीय तर शिर्डी येथे राज्यस्तरीय काँग्रेस प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. त्याच धर्तीवर जिल्हा व तालुकास्तरावर पदाधिकारी व कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर घेण्याचे नियोजन करण्यात येत आहे. यासाठी सहा प्रमुख विभागांच्या पदाधिकार्‍यांनी समन्वय ठेवावे.जिल्हास्तरीय कार्यशाळा दिवसभर असणार असून यासाठी प्रदेश व राष्ट्रीय पातळीवरील नेते मार्गदर्शन करणार आहेत.

देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी काँग्रेसने मोलाचा पुढाकार घेतला. स्वातंत्र्यानंतरही देशाच्या विकासात काँग्रेसचे मोठे योगदान आहे. देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त जिल्हाभरात भव्य रॅली काढण्याचे नियोजन आहे. ही रॅली जिल्हाभरात तीन दिवस तरी चालेल, असेही मोहिते-पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

Back to top button