कर्जमाफीचे ८ हजार ६१० कोटी बँकांकडे जमा | पुढारी

कर्जमाफीचे ८ हजार ६१० कोटी बँकांकडे जमा

पुणे : प्रतिनिधी

राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेत दुसर्‍या हप्त्यातील रक्कम प्राप्त झालेली असून बँकांच्या खात्यावर 8 हजार 610 कोटी रुपये जमा करण्यात आलेले आहेत. त्यातून संबंधित बँकांकडून नियमित कर्जफेड करणार्‍या सुमारे 12 लाखाहून अधिक शेतकर्‍यांच्या कर्जखात्याची पडताळणी घेवून ही रक्कम जमा करण्याचे आदेश बँकांना देण्यात आल्याची माहिती सहकार आयुक्त डॉ. विजयकुमार झाडे यांनी दिली. ही रक्कम तत्काळ जमा करण्यास सांगण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी पहिल्या हप्त्यात 2 लाख 39 हजार 77 शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर एकूण 899 कोटी 11 लाख रुपये जमा करण्याचे आदेश झाले. त्यापैकी प्रत्यक्षात 490 कोटी 65 लाख रुपये आणि 1 लाख 673 इतक्याच शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ गेल्या शुक्रवारपर्यंत झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे पहिल्या यादीतील सरसकट लाभार्थ्यांना कर्जमाफीचा लाभ नसल्याने आणि दुसरी यादीही प्राप्त झालेली नसल्याने चिंता व्यक्त करण्यात येत होती. त्या पार्श्‍वभुमीवर रात्री संपर्क साधला असता सहकार आयुक्त डॉ. झाडे यांनी ही माहिती दिली.

ते पुढे म्हणाले की, कर्जमाफीचा दुसरा हप्ता प्राप्त झाल्यानंतर व्यापारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडील शेतकरी कर्जदारांचाही समावेश आहे. कर्जमाफीच्या दुसर्‍या हप्त्यातील रक्कम बर्‍याचशा बँकांनी पडताळणी घेऊन बँकेंतील शेतकर्‍यांच्या कर्ज खात्यावर जमा केलेली आहे. उर्वरित ताळमेळ घेऊन बँकांकडून कर्जखाती रक्कम जमा करण्याची कार्यवाही सुरु आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसात बरीचशी रक्कम जमा होण्याची अपेक्षा आहे.  
 

Back to top button