जालन्यात १०८ ला दररोज ५५ खोटे कॉल | पुढारी

जालन्यात १०८ ला दररोज ५५ खोटे कॉल

जालना : प्रतिनिधी

ग्रामीण व शहरी भागात रुग्णांसाठी वरदान ठरलेल्या 108 क्रमांकावर रुग्णांसोबतच दररोज 55 फेक कॉल येत आहेत. त्यामुळे गरजू रुग्णांना याचा फटका बसत आहे. फेक कॉलमुळे रुग्णांना वेळेवर उपचार मिळण्यास विलंब होतो. अत्यावस्थ रुग्णांसोबतच सर्वाधिक कॉल प्रसूतीसाठी येत आहेत. 

जिल्ह्यात एप्रिल 2017 ते फेब्रुवारी 2018 दरम्यान अकरा महिन्यांत 17 हजार 89 रुग्णांना 108 क्रमांकाच्या 15 रुग्णवाहिकेद्वारे सेवा पुरविण्यात आली आहे. प्रत्येक दिवशी जवळपास एक रुग्णवाहिका 4 ते 5 रुग्णांना सेवा पुरविते. जिल्ह्यात अंबड ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेद्वारे 1419 बदनापूर 816, भोकरदन 883, घनसावंगी 1129, जाफराबाद 1123, मंठा 1072, नेर 1026, परतूर 1113, राजूर प्राथमिक 1073, शेलगाव 1278, टेंभूर्णी 970, वाटूर 1233,  जिल्हा रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेने 1174 तर जालना महिला रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेने 1080 तर शहागड प्राथमिक रुग्णालयातील रुग्णवाहिकेने सर्वाधिक 1700 रुग्णांना सेवा दिली आहे. ‘रुग्ण सेवा हीच ईश्‍वर सेवा’ हे ब्रिद अंगीकारलेल्या या रुग्णवाहिकेचे कंट्रोलिंग पुण्याहून होते.

ग्रामीण भागात आरोग्य सेवेची कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याने 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिका रुग्णासाठी जीवनवाहिनी ठरत आहेत. या रुग्णवाहिकेवरील दोन डॉक्टर्स रुग्णांशी अरेरावीची भाषा करणे तसेच खासगी प्रॅक्टिस करणे या कारणावरून निलंबित करण्यात आले आहेत, तर जाफराबाद तालुक्यात एका रुग्णवाहिकेच्या चालकाने रुग्णांकडून पैसे घेतल्याचे समोर आल्याने त्यास निलंबित करण्यात आले आहे. जिल्ह्यात नवीन सात रुग्णवाहिकांची मागणी करण्यात आली आहे. या रुग्णवाहिका भोकरदन तालुक्यातील धावडा, हसनाबाद, परतूर तालुक्यातील आष्टी मंठा तालुक्यातील तळणी, दहिफळ खंदारे, घनसावंगी तालुक्यांतील कुंभार पिंपळगााव या आरोग्य केंद्रासाठी पुरविण्यात येणार आहे. सध्या महिलांच्या प्रसूती व रुग्ण असलेल्या लहान मुलांना रुग्णवाहिकेसाठी प्राधान्य देण्यात येत आहे. 

बदनामी करण्यासाठीही वापर 

घनसावंगी तालुक्यातील एका गावात एक नाव सांगून, प्रसूती वेदना सुरू झाल्याचा फेक कॉल काही दिवसांपूर्वी करण्यात आला होता. त्या गावात रुग्णविाहका पोहचल्यानंतर ती विद्यार्थिनी असल्याचे समोर आले. मात्र या सर्व प्रकारात विद्यार्थिनीला खाली पाहण्याची वेळ आली.

एका रुग्णवाहिकेसाठी 3 चालक आहेत.  जिल्ह्यातील नागरिकांनी 108 रुग्णवाहिकेचा लाभ घ्यावा. फेक कॉल करण्यात आल्याने विनाकारण रुग्णवाहिका चालकांना त्रास होतोच, त्याचबरोबर गरजू रुग्णांना लाभ देताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. रुग्णांना उपचारानंतर सोडण्यासाठी 102 क्रमांकाच्या 58 रुग्णवाहिका कार्यरत आहेेत. 
-मनोज जाधव, 108 रुग्णवाहिका समन्वयक 
 

Back to top button