पाणीटंचाई निवारण्यासाठी ‘सीएसआर’चा आधार | पुढारी | पुढारी

पाणीटंचाई निवारण्यासाठी ‘सीएसआर’चा आधार | पुढारी

रत्नागिरी : प्रतिनिधी

आधीच नियोजनाच्या निधीला कात्री लागली असताना आता उन्हाळ्यात भेडसावणार्‍या पाणीटंचाईचे संकट निवारण्यासाठी ‘सीएसआर’ फंडाचा आधार घेण्यात येणार आहे. यासाठी कंपन्यांकडून देण्यात येणार्‍या फंडातून गावातील टंचाई दूर करण्याचा प्रस्ताव प्रशासनाला देण्यात आला आहे. यातून जिल्ह्यातील सुमारे 100 गावांतील अडीचशे वाड्यांची तहान भागविण्यात येणार आहे. 

यावर्षी पावसाची सरासरी कमी राहिल्याने पाणीटंचाईचे संकट जिल्ह्यावर कायम आहे. अशातच जलयुक्‍त शिवार योजना राबविताना आलेल्या तांत्रिक अडचणी तसेच कागदावरच उद्दिष्ट पूर्तता केलेल्या वनराई बंधार्‍यांमुळे यंदाच्या उन्हाळ्यातही पाणीटंचाई तीव्र होण्याचे संकेत आहेत. यावर्षी टंचाईग्रस्त गावांच्या दुपटीने वाड्यांची संख्या संभाव्य टंचाई आराखड्यात प्रस्तावित करण्यात आली होती. ही संख्या अडीचशेच्या आसपास आहे. ही समस्या निवारणासाठी विंधन विहिरींची दुरुस्ती, नादुरुस्त नळपाणी योजनांची दुरुस्ती आणि टंचाईच्या काळात लागणार्‍या विहिरीच्या अधिग्रहणासाठी नियोजनात निधीची तरतूद करण्यात आली होती. यासाठी सुमारे साडेपाच कोटींचा संभाव्य पाणीटंचाई आराखडा प्रस्तावित करण्यात आला होता.

त्यापैकी विहिरींच्या दुरुस्तीसाठी 98 लाख, नळपाणी योजनांच्या दुरुस्तीसाठी सव्वाचार कोटी आणि विहिरींच्या अधिग्रहणासाठी 4 लाखांचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. त्यापैकी 100 गावांतील अडीचशे वाड्यांमध्ये 34 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. निधीची तरतूद नसल्याने हा आराखडा रखडला आहे. मार्चअखेरपर्यंत जिल्ह्यात टंचाईची समस्या भेडसावण्याची शक्यता आहे.  
 

Back to top button