धुळे: नियतीचे कालचक्र फिरल्याने कुंभार झाले गपगार | पुढारी

धुळे: नियतीचे कालचक्र फिरल्याने कुंभार झाले गपगार

धुळे (पिंपळनेर) : अंबादास बेनुस्कर 

कोरोनाचे नियम शिथिल झाल्यानंतरही साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे या आपत्तीचे पडसाद अजूनही दिसून येत आहे. संपूर्ण उद्योगव्यवस्थाच कोलमडली असून, परिसरातील गावखेड्यातील छोटे उद्योगही बंद अवस्थेत दिसून येत आहे. परंपरागत कुंभार व्यावसायिकांचा व्यवसायही कोलमडला असून, माल तयार आहे. मात्र, माठाची विक्रीच होत नसल्याने कुंभार कारागीर हवालदिल झाला आहे.

वर्षभर मेहनत करून उन्हाळ्यात थंडगार पाण्यासाठी माठ बनवणा-या कुंभारावर उपासमारीची वेळ आली आहे. चक्र फिरवत नवनिर्मिती करणाऱ्या या कारागिरांना नियतीचे कालचक्र फिरल्याने ऐन हंगामात घरात गपगार बसण्याची वेळ आली आहे. उन्हाची तीव्रता वाढू लागताच मार्च, एप्रिल, मे महिन्यांमध्ये माठ, रांजण गरिबांचे फ्रीज म्हणून बाजारात विक्रीसाठी येत असतात. परंतु माठाची विक्रीच होत नसल्याने कुंभार कारागिरांपुढे पोटाची खळगी भरायची कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. उन्हाळ्यात मातीचा माठ, रांजण यांना मोठी मागणी असते. मात्र यादरम्यान जमा झालेल्या पुंजीवर संपूर्ण वर्षाची (अर्थचक्र) जमवाजमव करावी लागते. कोरोना आपत्तीने या व्यवसायावर मोठे संकट ओढवले आहे.

बाजारपेठ खुली झाली असली, तरी कुंभार कारागीर मात्र अद्यापही आर्थिक संकटातच चाचपडत आहेत. परंपरागत कला जपत माठ बनवण्याव्यतिरिक्त पोट भरण्याचे दुसरे साधन नसणाऱ्या कुंभार कारागिरांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. खापर – २५० ते ३००, माठ – २०० ते २५०, लग्नाची बेळमाथनी – १०१, चूल – ५० रुपये असे दर आहेत. विशेष म्हणजे माठ, घागर, खापर, पणत्या, बैल, गुलाबाई बनवण्यासाठी लागणारे साहित्य कुंभाराकडेच असते. माठ, घागर, खापर, भाजण्यासाठी उसाचा भुकठा, लागणारे इंधन यांचा खर्चही निघत नसल्याने शासनाने कुंभार कारागिरांना उदरनिर्वाहासाठी मदत करण्याची मागणी कुंभार कारागिरांकडून होत आहे. व्यवसायात संपूर्ण हयात घालवत आहोत. माठ पक्के करण्यासाठी भाजले जातात तसे आमचे हृदय महागाईच्या कालचक्रावर माठ तयार करूनही विक्री होत नसल्याने आयुष्य संकटात सापडले आहे.

– रामदास महारू, कुंभार कारागीर, पिंपळनेर (धुळे)

कुंभार आला अडचणीत – मध्य प्रदेश, गुजरात राज्यातील, पलसूद, सोनगड, करवाडा आदी ठिकाणांहून तयार माल खरेदी केला जातो. कारण माती, कचरा, घोड्याची लाद, भाजण्याची साधने नसल्याने सध्या तयार माल मागवला जात आहे. डिझेलचे दरही वाढल्याने वाहतुकीसाठी जादा पैसे मोजावे लागत आहेत. आधी कोरोनाच्या सावटामुळे आणि आता आर्थिक अडचणीत कुंभार समाज आला आहे.

हेही वाचा:

Back to top button