योगींच्या हिंदू युवा वाहिनीकडून भडकावू भाषण नाही; दिल्ली पोलीसांचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र | पुढारी

योगींच्या हिंदू युवा वाहिनीकडून भडकावू भाषण नाही; दिल्ली पोलीसांचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : हिंदू युवा वाहिनी तर्फे डिसेंबर २०२१ मध्ये राजधानी दिल्लीसह हरिद्वारमध्ये आयोजित कार्यक्रमात कुठल्याही समाजाविरोधात द्वेष पसरवणारे भाषण करण्यात आले नाही (हेट स्पीच) अशी माहिती दिल्ली पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून दिली आहे. दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमादरम्यान कुठल्याही समाजाबद्दल कुठलेही विशेष शब्दाचा वापर करण्यात आला नाही, असे देखील प्रतिज्ञापत्रातून सांगण्यात आले आहे.

सर्वोच्च न्यायालय दिल्ली आणि हरिद्वारमध्ये आयोजित कार्यक्रमादरम्यान तथाकथितरित्या द्वेष पसरवणारे, भावना भडकवणारे भाषण देणाऱ्या विरोधात एसआयटी तपास तसेच कारवाईचे निर्देश देण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी घेत आहे.

याचिकाकर्त्यांनी कारवाई संबंधी कुठलाही प्रकारचा संपर्क न करता थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. ही पद्धत संपुष्ठात यावी, असे मत देखील पोलिसांनी प्रतिज्ञापत्रातून व्यक्त केले आहे.

पत्रकार कुर्बान अली आणि पटना उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश अंजना प्रकाश यांनी ही याचिका दाखल केली आहे. मुस्लिम समुदायाविरोधात करण्यात आलेल्या द्वेषयुक्त भाषणाची विशेष तपास पथका मार्फत (एसआयटी) स्वतंत्र, विश्वसनीय तसेच निष्पक्ष तपास करण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली आहे.

हिंदू युवा वाहिनी : न्यायालयाने दिल्ली पोलिसांकडून उत्तर मागवून घेतले

याप्रकरणी न्यायालयाने दिल्ली पोलिसांकडून उत्तर मागवून घेतले होते. १९ डिसेंबर २०२१ मध्ये हिंदू युवा वाहिनीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात द्वेषयुक्त भाषण देण्यात आल्याच्या काही तक्रारीच्या आधारे एकत्रित तपास सुरू करण्यात आला होता.

सखोल तपास तसेच कार्यक्रमाचे व्हिडिओ तपासल्याअंती कार्यक्रमात कुठल्याही प्रकारचे ‘हेट स्पीच’ संबंधी पुरावे मिळाले नसल्याने तपास बंद करण्यात आल्याचे पोलिसांनी प्रतिज्ञापत्रातून सांगितले आहे.

Back to top button