भंडारा : भारनियमनाविरोधात शेकडो शेतकऱ्यांची वीज उपकेंद्रात तोडफोड | पुढारी

भंडारा : भारनियमनाविरोधात शेकडो शेतकऱ्यांची वीज उपकेंद्रात तोडफोड

भंडारा; पुढारी वृत्तसेवा : सततच्या भारनियमनामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान होत असल्याने संतप्त झालेल्या शेकडो शेतकऱ्यांनी वीज उपकेंद्रात जाऊन कार्यालयाची तोडफोड केली. तेथील वीज कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली. व बंद असलेला कृषी वीज वाहिनीवरील वीजपुरवठा सुरू करण्यास कर्मचाऱ्यांना भाग पाडले. ही घटना पवनी तालुक्यातील आसगाव येथील महावितरण उपकेंद्रात बुधवारी घडली.

मागील आठवड्याभरापासून कृषीपंपाला फक्त दोन ते तीन तास वीज पुरवठा सुरू आहे. उन्हाळी पिकांना वेळेवर पाणी मिळत नसल्याने पिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. भारनियमन बंद करुन कृषीपंपाना नियमित वीज पुरवठा करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.

त्यामुळे शेतकऱ्यांच्या असंतोषाचा भडका बुधवारी उडाला. कृषीपंपाचा वीज पुरवठा बंद झाल्याने सुमारे दोनशे शेतकऱ्यांनी आसगाव येथील महावितरणच्या उपकेंद्रावर धडक दिली. बंद केलेला वीजपुरवठा सुरू करा, अशी मागणी ते करु लागले. तेथील कर्तव्यावर असलेल्या कंत्राटी यंत्रचालकाने त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता त्याला मारहाण करण्यात आली. सहाय्यक तंत्रज्ञ समाकांत खंडारे यांनाही धक्काबुक्की केली. तर वरिष्ठ तंत्रज्ञ चित्रा सोनकुसरे यांना शिवीगाळ केली.

त्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी कार्यालयातील खुर्च्या, खिडकी, दरवाजे व गेटची तोडफोड केली. शेतकरी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर बंद असलेला आसगाव, ढोलसर, खैरी येथील कृषी वीजपुरवठा सुरू करण्यास तेथील कर्मचाऱ्यांना भाग पाडले. तसेच पुन्हा वीजपुरवठा बंद केला तर आम्ही पुन्हा येऊन तोडफोड करु, अशी धमकीसुद्धा दिली. याप्रकरणी सतिश कोरे यांच्या तक्रारीवरुन १०० ते १५० जणांविरुद्ध पवनी पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

हेही वाचलंत का ? 

Back to top button