

Vaibhav Suryavanshi IPL 2026
मुंबई : वैभव सूर्यवंशी... हे नाव केवळ आयपीएलमध्ये नव्हे तर देशाच्या सीमा ओलांडून प्रत्येक क्रिकेट चाहत्याच्या मनात आहे. बुधवारी झालेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या एलिमिनेटर सामन्यात त्याने सनरायझर्स हैदराबादच्या (SRH) गोलंदाजांची अक्षरशः पिसं काढली. त्याने अवघ्या २९ चेंडूंत ९७ धावा कुटल्या. सूर्यवंशीच्या या खेळीची चर्चा आता पाकिस्तानमध्येही रंगली असून, तिथले माजी क्रिकेटपटू आणि क्रीडा तज्ज्ञ वैभववर कौतुकाचा वर्षाव करताना दिसत आहेत.
पाकिस्तानमध्ये वैभव सूर्यवंशीला 'कॉम्प्लान बॉय' म्हणून संबोधले जात आहे. माजी क्रिकेटपटू आणि पाकिस्तानी क्रिकेट प्रशिक्षक बासित अली यांनी वैभवच्या या कामगिरीवर आपल्या यूट्यूब चॅनेलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी वैभव हा ख्रिस गेलपेक्षाही सरस खेळाडू असल्याचे म्हटले आहे.
आयपीएलच्या इतिहासात सर्वात वेगवान शतक ठोकण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे, गेल्या १३ वर्षांपासून अबाधित आहे. गेलने २०१३ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून (RCB) खेळताना पुणे वॉरियर्स इंडियाविरुद्ध अवघ्या ३० चेंडूंत शतक झळकावले होते. या पराक्रमामुळे त्याला 'युनिव्हर्स बॉस' म्हटले जाते. वैभव ख्रिस गेलचा हा विक्रम मोडण्याच्या अगदी उंबरठ्यावर होता. त्याने २८ चेंडूंत ९७ धावा केल्या होत्या आणि इतिहास रचण्यासाठी त्याला फक्त एका मोठ्या शॉटची गरज होती. मात्र, प्रफुल्ल हिंगेच्या चेंडूवर तो झेलबाद झाला आणि त्याचे शतक अवघ्या ३ धावांनी हुकले.
वैभवचे शतक हुकले असले तरी त्याने इतिहास रचला आहे. बासित अली म्हणाले, "ख्रिस गेल 'मिस्टर युनिव्हर्स' होता, पण आता हा मुलगा 'मिस्टर युनिव्हर्स' बनला आहे. कॉम्प्लान पिणारा बबलू... तुम्ही म्हणता ना मी त्याला सूर्यवंशी म्हणावे. काय अप्रतिम फलंदाजी केली आहे! येत्या काळात हा मुलगा ख्रिस गेलचा विक्रमही मोडून काढेल. जेव्हा हा 'बबलू' आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळेल, तेव्हा संपूर्ण जगावर राज्य करेल. 'ईस्ट ऑर वेस्ट, सूर्यवंशी इज द बेस्ट'... हा मुलगा कॉम्प्लान पिऊन खेळतो. शेवटी मी एवढंच म्हणेन की, बबलू मियाँ, तुम्हीच मिस्टर युनिव्हर्स आहात, असेच खेळत राहा."
पाकिस्तानच्या सामान्य जनतेमध्येही वैभवची मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे. कराचीमध्ये राहणाऱ्या एका नागरिकाने एका शोमध्ये सांगितले की, "आज कराची, पाकिस्तानमध्ये ईद आहे, पण लोक ईदपेक्षा जास्त वैभव सूर्यवंशीचे अभिनंदन करत आहेत." त्यावर शोच्या महिला सूत्रसंचालकाने (होस्ट) म्हटले, "मला तर वाटतेय खरी ईद सूर्यवंशीच साजरी करत आहे."
एका क्रिकेट शोमध्ये अँकरने वैभवचे कौतुक करताना म्हटले, "२९ चेंडूंत या मुलाने ९७ धावा केल्या, त्याचा स्ट्राईक रेट साडेतीनशेच्या आसपास होता. समोर कोणताही गोलंदाज असो, तो सर्वांना धु-धु धुवत आहे. सध्या जग इतके थक्क झाले आहे की, हा मुलगा खरंच माणूस आहे की 'एआय जनरेटेड' (AI Generated) आहे, अशी शंका येत आहे."
स्पोर्ट्स अँकर मीराब जीशान यांच्या शोमध्ये पाकिस्तानचे क्रीडा विश्लेषक मोहम्मद मोहसिन यांनीही वैभव सूर्यवंशीचे तोंडभरून कौतुक केले. मोहसिन म्हणाले, "असा क्रिकेट मी कधी पाहिला नव्हता आणि कधी विचारही केला नव्हता. असे कोणी खेळूच शकत नाही. सूर्यवंशीकडे ही गॉड गिफ्टेड टॅलेंट आहे, जे त्याने मेहनतीने जोपासले आहे. सूर्यवंशीकडे प्रत्येक चेंडू खेळण्याची ताकद आहे. असा एकही चेंडू बनला नाही जो तो खेळू शकणार नाही. तो पॅट कमिन्ससारख्या जागतिक दर्जाच्या गोलंदाजालाही अगदी सहज खेळला. दडपणाखाली खेळणे त्याच्या रक्तातच नाही."
पाकिस्तानच्या एका यूट्यूब चॅनेलवर क्रीडा पत्रकाराने सांगितले की, सूर्यवंशीच्या वादळी खेळीमुळे पाकिस्तानातही आयपीएलची मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे."वैभव सूर्यवंशीने जे करून दाखवले आहे, ते पाकिस्तानातही ट्रेंड होत आहे. आमच्याकडे आयपीएलवर बंदी आहे, तरीही पाकिस्तानी नागरिक व्हीपीएन (VPN) वापरून सूर्यवंशीची ती खेळी पुन्हा पुन्हा पाहत आहेत आणि आमच्या क्रिकेटपटूंना लाजवत आहेत. आमचा स्टार बॉलर हॅरिस रौफ म्हणतो ना की, आमच्यासाठी वैभव सूर्यवंशी काहीच नाही... पण देवाचा कृपेने (खुदा न खास्ता...) जर कधी वैभव आणि शाहिन आफ्रिदी किंवा वैभव आणि हॅरिस रौफ आमनेसामने आले, तर ६ चेंडूंत ६ षटकार नक्की आहेत."
पाकिस्तानात काही लोक वैभवचे कौतुक करत असतानाच त्याच्या वयावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. पाकिस्तानचे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार अब्दुल गफार यांनी 'एक्स' पोस्टमध्ये लिहिलं आहे की, "मला वाटत नाही की वैभव अवघ्या १५ वर्षांचा आहे. तो देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये जे करत आहे ते उत्तम आहे, पण त्याची खरी परीक्षा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये होईल. खरी परीक्षा अजून बाकी आहे."