

Vaibhav Sooryavanshi IPL 2026
यंदाच्या आयपीएलमध्ये युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. मात्र, आता वैभवला खेळवणार्या राजस्थान रॉयल्स हा संघ कायदेशीर अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. वैभवला १५ व्या वर्षी या कोट्यवधींच्या लीगमध्ये खेळू देऊन नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते सीएम शिवकुमार नायक यांनी आयपीएल गव्हर्निंग कौन्सिल आणि राजस्थान रॉयल्सविरुद्ध एफआयआर (FIR) दाखल करण्याचा इशारा दिला आहे.
राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या वैभवने नुकतेच सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात केवळ ३६ चेंडूत शतक ठोकले. यासह त्याने टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद १,००० धावा पूर्ण करण्याचा विक्रमही आपल्या नावावर केला. वैभवने या खेळीत १२ षटकार आणि ५ चौकार मारले. आयपीएलच्या इतिहासातील हे तिसरे सर्वात जलद शतक ठरले आहे. याआधी ख्रिस गेल (३० चेंडू) आणि स्वतः वैभवने गेल्या वर्षी (३५ चेंडू) जलद शतकाची नोंद केली होती.चालू हंगामात वैभवने जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट आणि जोश हेझलवूड यांसारख्या दिग्गज गोलंदाजांची धुलाई केली आहे.
सामाजिक कार्यकर्ते नायक यांच्या मते, वैभवने सध्या क्रिकेट खेळण्याऐवजी आपल्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करायला हवे. एका दूरचित्रवाणी चर्चेदरम्यान ते म्हणाले की, "राजस्थान रॉयल्सच्या १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीचे शोषण केले जात आहे. हे बालकामगाराशिवाय दुसरे काहीही नाही. इतक्या लहान मुलाला इतक्या मोठ्या लीगमध्ये ते कसे काय खेळवू शकतात?" याप्रकरणी ते फ्रँचायझीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत आहेत.
भारतीय कायद्यानुसार, १४ वर्षांखालील मुलांना कामावर ठेवण्यास मनाई आहे, तर १४ ते १८ वयोगटातील किशोरवयीन मुले विशिष्ट अटींनुसार बिगर-धोकादायक क्षेत्रात काम करू शकतात. मात्र, क्रीडा क्षेत्रातील उपक्रमांना या कायद्याच्या कक्षेतून वगळण्यात आले आहे.
वैभव सूर्यवंशी याआधीही चर्चेत आला होता जेव्हा पाकिस्तानचे क्रिकेट तज्ज्ञ नौमान नियाज यांनी त्याच्यावर अधिक ताकद मिळवण्यासाठी 'AI चिप' वापरल्याचा अजब आरोप केला होता. दरम्यान, या वादाच्या सावटातही वैभवच्या कामगिरीची दखल निवड समितीने घेतली आहे. जून-जुलैमध्ये होणाऱ्या आयर्लंड दौऱ्यासाठी निवडलेल्या ३५ टी-२० खेळाडूंच्या संभाव्य यादीत वैभव सूर्यवंशीचा समावेश करण्यात आला आहे.