

Vaibhav Sooryavanshi VIDEO: वैभव सूर्यवंशीने सनराईजर्स हैदराबाद विरूद्धच्या सामन्यात धडाकेबाज फलंदाजी करत २९ चेंडूत ९७ धावा ठोकल्या. तसेच त्याने भीमकाय ख्रिस गेलचा षटकारांचा विक्रम देखील मोडला. या विजयानंतर वैभव सूर्यवंशीच्या फलंदाजीची जगभर चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, वैभव सूर्यवंशीचा सरावावेळचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यात दिग्गज सुनिल गावसकर दिसल्यानंतर वैभव सूर्यवंशीने धावत जाऊन जे काही केलं ते पाहून सर्वजण त्याच्या संस्कारांचे कौतुक करत आहेत.
हैदराबादविरूद्धचा सामना सुरू होण्यापूर्वी वैभव सूर्यवंशी वॉर्म अप करत होता. त्यावेळी मैदानावरच समालोचक आणि माजी कर्णधार सुनिल गावसकर आणि संजय बांगर हे उभे होते. त्याच्या जोडीला जतीन सप्रू देखील होते. वैभवचे सुनिल गावसकरांकडे लक्ष जाताच तो वॉर्म अप सोडून धावत आला आणि गावसकरांच्या पाया पडला. त्यानंतर त्याने शेजारी उभ्या असलेल्या बांगर यांचा देखील चरणस्पर्श केला. ज्यावेळी वैभव जतीन सप्रु यांच्या पाया पडायला गेला त्यावेळी जतीन सप्रु यांनी आपले पाय खेचत त्याला माझ्या पाया पडू नकोस असं सांगितलं.
राजस्थान विरूद्ध हैदराबाद सामन्याबद्दल बोलायचं झालं तर वैभव सूर्यवंशीने २९ चेंडूत ९७ धावा ठोकत राजस्थानच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. राजस्थानने हा सामना जिंकल्याने आयपीएल फायनल खेळण्याची त्यांची आशा जीवंत राहिली असून आता ते गुजरात टायटन्सविरूद्ध खेळणार आहेत.
सामना झाल्यावर सूर्यवंशीने सांगितलं की, 'आम्ही ज्यावेळी जिंकतो त्यावेळी आम्ही फक्त सकारात्मक गोष्टी पुढे नेतो. आम्ही पुढचा सामना देखील त्याच पद्धतीने जिंकण्याचा प्रयत्न करतो. आम्ही फायनलमध्ये पोहचण्याचा प्रयत्न करणार आहोत.'
गुजरात विरूद्धच्या पुढच्या सामन्याबद्दल मनात काय सुरू आहे असे विचारले असता वैभव म्हणाला, 'मी याबाबत थोडा विचार करतोय मात्र जास्त नाही. मी फक्त माझा खेळ करणार आहे. मी याबाबत जास्त विचार करणार नाही. मात्र मला वाटलं की काही गोष्टींवर काम करायला हवं तर मी त्याच्यावर करेन.'
तो पुढे म्हणाला, 'विरोधी संघात कोण कोण गोलंदाज आहेत आणि मी त्यांचा कसा सामना करू शकतो याचा विचार करतो. मी सीमारेषा किती लांब आहे या गोष्टीचा देखील विचार करतो. मी सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करतो. मी ज्यावेळी सकारात्मक असतो त्यावेळी गोलंदाज दबावात राहतात. त्यामुळं मी ते पुढच्या सामन्यात देखील करणार आहे.'
वैभवला तू ख्रिस गेलचे आयपीएल इतिहासातील सर्वात वेगवान शतकाचा विक्रम मोडण्याच्या जवळ होतास असं विचारलं असता तो म्हणाला की मला या मोठ्या विक्रमाची कल्पना देखील नव्हती. वैभव म्हणाला की, या विक्रमाबाबत मला मी बाद झाल्यावर कळालं. मला संघासाठी जास्तीजास्त योगदान द्यायचं होतं. बाकी शतकं होत राहतील.