

MS Dhoni Last IPL Season: इंडियन प्रीमियर लीगच्या २०२६ हंगामाकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले असतानाच, महेंद्रसिंग धोनीच्या भवितव्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू इरफान पठाणच्या मते, आयपीएल २०२६ हा धोनीचा शेवटचा हंगाम ठरू शकतो. त्यामुळे Chennai Super Kings चाहत्यांसाठी हा हंगाम भावनिक असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जिओहॉटस्टारवरील चर्चेदरम्यान पठाण म्हणाला की, सीएसके आणि आयपीएल या दोन्हींसाठी धोनी अत्यंत महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याच्या मते, “धोनीशिवाय सीएसकेची कल्पना करणे कठीण आहे. कदाचित धोनीचा हा शेवटचा हंगाम असेल.”
इरफानने असेही म्हटले की, धोनी मैदानावर किती सामने खेळणार हे स्पष्ट नसले तरी संघासाठी त्याची उपस्थिती अत्यंत महत्त्वाची असेल. विशेषतः ड्रेसिंग रूममध्ये त्याच्या अनुभवाचा आणि नेतृत्वाचा फायदा तरुण खेळाडूंना होणार असल्याचे त्याने सांगितले.
सीएसकेच्या संघात नव्याने आलेल्या संजू सॅमसन बाबत बोलताना पठाण म्हणाला की, सॅमसनलाही या संघातून नेतृत्वाचे धडे मिळतील. सध्या ऋतुराज गायकवाड हा संघाचा कर्णधार असला तरी भविष्यासाठी दोन-तीन खेळाडूंना नेतृत्वासाठी तयार केले जात आहे. या प्रक्रियेत धोनीची भूमिका महत्त्वाची असणार आहे.
दरम्यान, सीएसकेसाठी आणखी एक मोठा बदल म्हणजे यावेळी अनुभवी ऑलराउंडर रवींद्र जडेजा संघात नसणार आहे. तो आता Rajasthan Royals कडून खेळणार आहे. पठाणच्या मते, उत्तर प्रदेशचा तरुण ऑलराउंडर प्रशांत वीर हा जडेजाच्या जागी संघात प्रभावी कामगिरी करू शकतो.
इरफानने जडेजाच्या कारकिर्दीचे उदाहरण देत सांगितलं की, सुरुवातीला तोही तरुण खेळाडू होता. शेन वॉर्न यांनी राजस्थान रॉयल्समध्ये असताना त्याला तयार केले आणि तो पुढे जाऊन मोठा खेळाडू बनला. त्याचप्रमाणे तरुण खेळाडूंनाही सीएसकेमध्ये संधी मिळाल्यास ते मोठे खेळाडू बनू शकतात.
त्याने सांगितले की, सीएसके संघ व्यवस्थापन तरुण खेळाडूंना खूप आत्मविश्वासाने तयार करत आहे. स्टीफन फ्लेमिंग प्रशिक्षक आणि अनुभवी खेळाडूंचे मार्गदर्शन यामुळे संघात सकारात्मक वातावरण तयार होत आहे. आता आयपीएल २०२६ हंगामात सीएसकेचा मुख्य उद्देश सहावे विजेतेपद जिंकण्याचा असेल. जर संघाने हा किताब जिंकला, तर धोनीसाठी तो एक संस्मरणीय निरोप ठरू शकतो. त्यामुळे या हंगामाकडे चाहत्यांसह क्रिकेटविश्वाचेही विशेष लक्ष लागले आहे.