

IPL 2026 Captains List for All 10 Teams: भारतीय क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता आता पुन्हा एकदा वाढू लागली आहे. कारण लवकरच Indian Premier League सुरू होणार आहे. बीसीसीआयने या स्पर्धेच्या काही सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले असून आयपीएलचा १९वा हंगाम २८ मार्चपासून सुरू होणार आहे.
स्पर्धेचा पहिला सामना गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. हा सामना बेंगळुरूमधील M. Chinnaswamy Stadium येथे खेळला जाणार आहे. सध्या क्रिकेट बोर्डाने सुरुवातीच्या २० सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले असून उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक राज्य निवडणुका संपल्यानंतर जाहीर केले जाणार आहे.
आयपीएलच्या नव्या हंगामापूर्वी सर्व संघांचे कर्णधार कोण असणार याबाबतची माहिती समोर आली आहे. अनुभवी खेळाडूंसोबतच काही युवा कर्णधारही या हंगामात संघांचे नेतृत्व करताना दिसणार आहेत.
ऋतुराज गायकवाड हा Chennai Super Kings संघाचे नेतृत्व करणार आहे. एम.एस. धोनीने २०२४ च्या आधी कर्णधारपदाची जबाबदारी ऋतुराजकडे सोपवली होती. त्यानंतर गायकवाडच्या नेतृत्वात संघाने चांगली कामगिरी केली आहे. २०२३ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देण्यातही त्याची भूमिका महत्त्वाची होती.
हार्दिक पांड्या हा पुन्हा एकदा Mumbai Indians संघाचे नेतृत्व करणार आहे. त्याने २०२२ मध्ये Gujarat Titans ला विजेतेपद मिळवून दिले होते आणि २०२३ मध्येही संघाला अंतिम फेरीपर्यंत नेले होते. त्यानंतर तो पुन्हा मुंबई इंडियन्समध्ये परतला आणि २०२४ पासून संघाचे नेतृत्व करत आहे.
गतविजेते Royal Challengers Bengaluru संघाचे नेतृत्व पुन्हा रजत पाटीदार करणार आहे. २०२५ हंगामापूर्वी त्याची कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्याच्या नेतृत्वाखाली आरसीबीने जवळपास दोन दशकांच्या प्रतीक्षेनंतर पहिले आयपीएल विजेतेपद जिंकले.
श्रेयस अय्यर हा Punjab Kings संघाचा कर्णधार असणार आहे. २०२४ मध्ये Kolkata Knight Riders ला आयपीएल विजेतेपद मिळवून दिल्यानंतर पंजाबने त्याला २६.७५ कोटी रुपयांना संघात घेतले. त्याच्या नेतृत्वाखाली पंजाब संघ प्लेऑफपर्यंत पोहोचला.
शुभमन गिल हा Gujarat Titans चा कर्णधार असणार आहे. हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समध्ये परतल्यानंतर २०२४ मध्ये गिलने ही जबाबदारी स्वीकारली होती.
अजिंक्य रहाणे हा Kolkata Knight Riders चा कर्णधार असणार आहे. मिनी लिलावानंतर संघाची नव्याने बांधणी करण्यात आली असून आगामी हंगामात संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.
पॅट कमिन्स हा सलग तिसऱ्या हंगामात Sunrisers Hyderabad चे नेतृत्व करणार आहे. २०२४ च्या लिलावात २०.५० कोटी रुपयांना त्याची खरेदी करण्यात आली होती.
ऋषभ पंत हा Lucknow Super Giants चा कर्णधार असणार आहे. २०२५ हंगामापूर्वी KL Rahul ला संघातून रिलीज केल्यानंतर पंतला ही जबाबदारी देण्यात आली होती. त्याला २७ कोटी रुपयांना खरेदी करण्यात आले होते, ज्यामुळे तो आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला.
अक्षर पटेल हा Delhi Capitals चा कर्णधार असणार आहे. २०१९ पासून तो या फ्रँचायझीसोबत आहे आणि संघाचा महत्त्वाचा खेळाडू मानला जातो.
तर रियान पराग हा युवा ऑलराउंडर Rajasthan Royals चे नेतृत्व करणार आहे. मागील हंगामात काही सामन्यांमध्ये त्याने हंगामी कर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळली होती आणि आता संपूर्ण हंगामासाठी त्याच्याकडे कर्णधार पदाची धुरा असेल.