

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन मैदानावर 2 जुलैपासून खेळवला जाणार आहे. या महत्त्वाच्या सामन्यात भारतीय संघाचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल याच्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. तो महान फलंदाज सुनील गावस्कर यांचा सुमारे 50 वर्षे जुना विक्रम मोडण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे.
भारत विरुद्ध इंग्लंड दुसरी कसोटी 2 जुलैपासून बर्मिंगहॅम येथे खेळवली जाणार आहे.
यशस्वी जैस्वालला 2000 कसोटी धावा पूर्ण करण्यासाठी 97 धावांची आवश्यकता आहे.
हा टप्पा गाठल्यास तो सर्वात कमी सामन्यांमध्ये 2000 धावा करणारा भारतीय ठरेल आणि गावस्करांचा विक्रम मोडेल.
लीड्समधील हेडिंग्ली येथे खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याच्या यशस्वीने पहिल्या डावात 159 चेंडूत 101 धावा केल्या होत्या. जर या युवा फलंदाजाने दुस-या कसोटीतही अतुलनीय कामगिरी केली तर तो भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एक नवा अध्याय रचेल.
यशस्वी जैस्वालसाठी इंग्लंड दौऱ्याची सुरुवात अत्यंत प्रभावी ठरली. या दौऱ्यात शतक झळकावणारा तो पहिला खेळाडू होता. त्याच्याव्यतिरिक्त, पहिल्या सामन्यात शुभमन गिल, केएल राहुल यांनी 1-1 तर ऋषभ पंतने 2 शतके झळकावली. अशप्रकारे भारतीय फलंदाजांच्या बॅटमधून लीड्स कसोटीत एकूण पाच शतके आली. मात्र, इतकी चांगली कामगिरी करूनही भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे, दुसऱ्या सामन्यात भारताला जोरदार पुनरागमन करावे लागणार आहे. त्यामुळे फलंदाजांकडून पुन्हा एकदा मागिल उत्कृष्ट कामगिरीची पुनरावृत्तीची अपेक्षा असेल.
यशस्वी जैस्वालच्या कसोटी कारकिर्दीचा आढावा घेतल्यास, त्याने आतापर्यंत खेळलेल्या 20 कसोटी सामन्यांमध्ये 52.86 च्या उत्कृष्ट सरासरीने 1903 धावा केल्या आहेत. तो कसोटी क्रिकेटमध्ये 2000 धावांचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठण्यापासून केवळ 97 धावा दूर आहे. जर त्याने एजबॅस्टन कसोटीत हा टप्पा ओलांडला, तर तो सर्वात कमी सामन्यांमध्ये 2000 कसोटी धावा करणारा भारतीय फलंदाज ठरेल. सध्या हा विक्रम ‘लिटिल मास्टर’ सुनील गावस्कर यांच्या नावावर आहे.
गावस्कर यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात धावांचा पाऊस पाडत केली होती. त्यांनी सुरुवातीच्या 23 सामन्यांमध्ये आपल्या 2000 कसोटी धावा पूर्ण केल्या होत्या. जर यशस्वी जैस्वाल एजबॅस्टनमध्ये ही कामगिरी करण्यात अयशस्वी ठरला, तरीही त्याच्याकडे गावस्कर यांचा विक्रम मोडण्यासाठी आणखी एक संधी उपलब्ध असेल.
सर्वात जलद 2000 धावा करणाऱ्या इतर भारतीय फलंदाजांमध्ये राहुल द्रविड आणि वीरेंद्र सेहवाग हे सुनील गावस्कर यांच्या पाठोपाठ आहेत. या दोन्ही माजी दिग्गज खेळाडूंनी ही कामगिरी करण्यासाठी 25 कसोटी सामने खेळले होते.
सुनील गावस्कर : 23 सामने
गौतम गंभीर : 24 सामने
राहुल द्रविड : 25 सामने
वीरेंद्र सेहवाग : 25 सामने
विजय हजारे : 26 सामने
सर्वात कमी डावांमध्ये 2000 कसोटी धावा करण्याच्या विक्रमाचा विचार केल्यास, राहुल द्रविड आणि वीरेंद्र सेहवाग हे सुनील गावस्कर यांच्यापेक्षा पुढे आहेत. या दोघांनी प्रत्येकी 40 डावांमध्ये हा विक्रम केला होता, तर गावस्कर यांना यासाठी 44 डाव खेळावे लागले होते. यशस्वी जैस्वालने आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये 38 डाव खेळले आहेत. जर त्याने दुसऱ्या कसोटीच्या पहिल्याच डावात 97 धावा पूर्ण केल्या, तर तो सर्वात कमी डावांमध्ये 2000 कसोटी धावा करणारा भारतीय फलंदाज बनण्याचा बहुमानही पटकावेल.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावा पूर्ण करणारा जगातील सर्वात जलद फलंदाज असल्याचा विक्रम माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू डॉन ब्रॅडमन यांच्या नावावर आहे. ब्रॅडमन यांनी ऑस्ट्रेलियन संघासाठी त्यांच्या 15 व्या कसोटीत 2000 धावांचा टप्पा ओलांडला. वेस्ट इंडिजचा जॉर्ज हेडली 17 कसोटी सामन्यांमध्ये हा पराक्रम करत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
डॉन ब्रॅडमन (ऑस्ट्रेलिया) : 15 कसोटी
जॉर्ज हेडली (वेस्ट इंडिज) : 17 कसोटी
हर्बर्ट सटक्लिफ (इंग्लंड) : 22 कसोटी
मायकेल हसी (ऑस्ट्रेलिया) : 20 कसोटी
मार्नस लाबुशेन (ऑस्ट्रेलिया) : 20 कसोटी